Breaking News

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी निमगाव वाघा येथे अभिवादन

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शाळेच्या शिक्षिका शुभांगी धामणे व मंदा साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव तथा राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदा डोंगरे, लहानू जाधव आदिंसह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात किसन वाबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. पै. नाना डोंगरे म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन खर्‍या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचे बीज रोवले. समाजाचा विरोध झुगारुन त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्याने आज स्त्रीयांना समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे. अंधारलेल्या समाजात स्त्रीयांना शिक्षण देवून दीपस्तंभाप्रमाणे सावित्रीबाईंनी महिलांना प्रगतीचा मार्ग दाखविला. त्यांचे योगदान न विसरता येणारे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत पवार यांनी केले. आभार पै. संदिप डोंगरे यांनी मानले.