Breaking News

डहाणू-विरार दरम्यान 5 वर्षात अपघातात 613 जणांचा बळी

मुंबई : पश्‍चिम रेल्वेच्या डहाणूदरम्यान रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे गेल्या 5 वर्षात वेगवेगळ्या अपघातात 613 जणांचा बळी गेला आहे. वसई-विरारची लोकसंख्या वाढल्यामुळे येथील वर्ग पालघर, डहाणूकडे स्थलांतरीत होत आहे. पश्‍चिम रेल्वेने डहाणूपर्यंतच्या सेवेला उपनगरीय दर्जा दिला असला तरी गाड्यांच्या संख्येत पुरेशी वाढ न झाल्याने येथील प्रवाशांना आता ट्रेनच्या दरवाज्यात लटकून प्रवास करावा लागतो आहे. डहाणू-विरार दरम्यानच्या वाढत्या गर्दीमुळे हे अपघाती मृत्यू झाले असून हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कोणतीही उपाययोजना करीत नाही.


गेली अनेक वर्षे येथील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी संघटना व येथील प्रशासन प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ घडवून आणण्याबाबत सतत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. येथील प्रवाशांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथे यानिमित्ताने होत आहे.मुंबईतील महागडी घरे परवडत नसल्याने सर्वसामान्यांनी वसई-विरारला पसंती देऊन स्वस्त घरासाठी तो पर्याय निवडला. मात्र येथेही घरांचे भाव वाढत चालल्याने तसेच गर्दी प्रचंड वाढल्याने नागरिकांनी स्वस्त घरासाठी पालघर, बोईसर, डहाणूची निवड केली.

येथील वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे रेल्वेमधील गर्दी पूर्वीपेक्षा दुपटीने वाढू लागली. हा नागरीकरणाचा विस्तार येथील रेल्वे सेवांच्या मानाने मोठा असल्याने येथील अपघातात होणारे हे मृत्यू या मागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील बहुसंख्य बळी हे प्रवास करतांना खाली पडणे, लोहमार्ग ओलांडत असतांना धडक बसणे, दरवाजाला लोंबकळून प्रवास करताना पोलचा फटका बसून खाली पडणे. अशी आहेत. ती दूर करण्यासाठी रेकची संख्या वाढविणे, त्यांच्या डब्यांची संख्या वाढविणे व पादचारी पुलांची संख्या आणि रुंदी वाढविणे सरकते जीने बसविणे आदी उपाय करण्याची आवश्यकता आहे.


येथील परिसरातील प्रवासी जात असताना रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी व रेटारेटी होते. प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. कारण त्यांना दुसरा पर्यायच उपलब्ध नसतो.या मार्गावर वाढत असलेले प्रवासी व येथे या पाच वर्षात बळी गेल्याची आकडेवारी पाहता रेल्वे प्रशासनाने येथील लोकलची संख्या तसेच डबे वाढवावेत, तसेच लांब अंतराचा प्रवास करणार्‍यांना मेल एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत. येथील लोकल सेवा मुंबईप्रमाणे करून या मार्गावर दर 30 मिनिटाला एक लोक ल सोडण्याची मागणीही रेल्वेकडे केली आहे. डहाणू ते विरार दरम्यान अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचेही जानेवारी 2013 ते डिसेंबर 2017 दरम्यान 613 प्रवाशांचा बळी गेल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.