Breaking News

राज्यात रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापनेच्या घोषणेने रिक्षा चालकांमध्ये उत्साह

वित्तमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नुकताच चौथा अर्थसंकल्प बजेट सादर केला असता, यामध्ये ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा झाल्याने अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन होण्यासाठी जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे आग्रही भुमिका मांडण्यात आली होती. या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.
महाराष्ट्रात जवळपास 20 लाखापर्यंत रिक्षा चालकांची संख्या आहे. त्यांच्या विविध प्रश्‍न व अडचणी सोडविण्यासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी स्व. शंकरराव घुले यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला होता. यानंतर कॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कॉ. बाबा आरगडे, उपाध्यक्ष दत्ता वामन यांनी पाठपुरावा चालू ठेवला. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. संग्राम जगताप, प्रधान सचिव बंदरे व परिवहन आदिंना निवेदने देवून मंत्रालयात पाठपुरावा चालू होता.