Breaking News

पिक विमा, रब्बी दुष्काळी अनुदानासह बोंड अळी नुकसान अनुदान शेतकर्‍यांसाठी अद्यापही मृगजळ!

तालुक्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगाम पीक विमा तसेच मागील वर्षीचे रब्बीचे दुष्काळी अनुदान व बोंड अळी नुकसान अनुदान असे कोणतेच अनुदान शेतकर्‍यांना अद्यापही मिळाले नसल्याने शेतकर्‍यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तर मागील सहा महिन्यांपासून आठ दिवसांत अनुदान जमा होईल हे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आश्‍वासन हे आश्‍वासनच राहिले आहे. मार्चएन्ड असल्याने शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहे. मात्र शेतकर्‍यांचा पालकमत्र्यांकडून भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. 


खरीप हंगाम 2017 चा पन्नास टक्के कर्जदार शेतकर्‍यांचा विमा हप्ता जिल्हा सहकारी बँकेने भरला व शेतकर्‍यांनी पन्नास टक्के विमा हप्ता भरला होता. जामखेड तालुक्यात सुमारे पन्नास हजारांच्या आसपास शेतकरी बांधव सहकारी संस्थेचे सभासद आहेत. याचा अद्याप कसलाही निर्णय नाही. यामुळे शेतकरी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मागील रब्बी हंगामात दुष्काळामुळे अनेक ठिकाणचे पीके वाया गेले होते. यामुळे रब्बी अनुदान शेतकर्‍यांना लवकरात लवकर मिळेल हे पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे मागील वर्षांपासून सांगत होते. वर्ष सरून गेले तरीही पालकमंत्र्यांचे आश्‍वासन आश्‍वासनच ठरले आहे. अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झाला नसून शेतकरी वर्गास अधांतरी ठेवले असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी बर्‍यापैकी पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला होता, शेतकर्‍यांनी कपाशी पिक मोठ्या प्रमाणावर घेतले, त्यातच ऐनवेळी कपाशीवर बोंड अळी रोग झाडांवर पडल्यामुळे कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. परंतू याची कोणतीही पुर्तता नाही. अद्याप कोणतेही अनुदान शेतकर्‍यांना मिळाले नाही. पालकमंत्री राम शिंदे हे मागील वर्षांपासून सांगत होते की, रब्बी पीकाचे अनुदान लवकरात लवकर मिळेल परंतु हे फक्त पुढारी आश्‍वासन ठरले नाही. अद्यापही कसलेही अनुदान मिळाले नाही.


मार्च एन्ड असल्यामुळे शेतकर्‍यांकडे असणार्‍या वेगवेगळ्या कर्जाची वसुली सध्या सुरू आहे. भरणा करण्यासाठी काही तरी रक्कम जमा होईल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती, परंतू कसलेही अनुदान जमा झाले नाही. यामुळे शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील पिक विमा व रब्बी अनुदान तसेच बोंड आळी अनुदान लवकरात लवकर जमा व्हावे अशी मागणी शेतकरी बांधव करत आहेत.