‘राहुरी’च्या शिरपेचातील मुकुटमणी लोकनेते प्रसाद तनपुरे!
‘स्वार्थासाठी बुवा बने । स्वार्थासाठी नेता होणे ।
स्वार्थासाठी प्राणहि देणे घेणे । सर्वचि करिती बिचारे ।
परि यातून जो निघाला । निष्काम सेवा कराया लागला ।
तोचि सेवक म्हणोनि चमकला सर्व लोकि.!’
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा उपदेश प्रत्यक्ष आचारणात आणून बापूसाहेब अर्थात प्रसाद तनपुरे यांनी सेवाव्रत हाती घेतले. राहुरी तालुक्याचे शिल्पकार कै. डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या आशिर्वादाने सुरू केेलेल्या राजकीय वाटचालीत तब्बल ५ वेळेस विधानसभेत व एकदा लोकसभेत बापूसाहेबांनी प्रतिनिधित्व केले. मतदारसंघापुरतेच मर्यादित न राहता राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसे पाहिल्यास या असामान्य नेतृत्वाचे कार्य मोजपट्टीत मावणारे नाही. जनतेच्या समस्या आणि विकासकामांची कसरत करीत आयुष्य खर्ची घालविणाऱ्या या नेत्याविषयी कितीही लिहिले तरी ते कमीच आहे.
पश्चिम महाराष्ट्रात क्रीडा संकुल बांधयचेच नाही, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे अहमदनगर येथील क्रीडा संकुलाचा प्रकल्प तब्बल दोन वर्षे मंजुरीच्या टप्प्यात अडकला होता. अहमदनगर शहर स्वतःच्या मतदारसंघात नसलेले ठिकाण. तरीही जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे क्रिडा संकुल उभारण्यासाठी बापूसाहेब तनपुरे यांनी विधानसभेत आवाज उठवून अभ्यासपूर्ण विवेचनाद्वारे मंजुरी मिळवून दिली. क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिवजयंतीच्या दिवशी दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण वेळेवर व नियमित होण्यासाठी शासनास जाग आणून त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला लावली. तरूण वयात उत्कृष्ठ व्हॉलीबॉलपटू म्हणून नावलौकिक मिळवून अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
ज्ञान विज्ञानाइतकंच ‘ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर’ हे त्यांचे श्रद्धास्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसाला जो ज्ञानभक्तीयोगाचा मार्ग सांगितला, तो त्यांना अधिक वंदनीय वाटतो. डोळस-ज्ञानयुक्त भक्तिची शिकवण देणारा आणि कर्माचं महत्व ठसवणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नगर जिल्ह्याच्या भूमीत लिहिला गेला, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. म्हणूनच त्यांनी सन १९९२-९३ मध्ये युती शासनाच्या काळात ज्ञानेश्वर मंदिर विकासाचा प्रश्न विधानसभेत मांडून हा विषय सर्वप्रथम ऐरणीवर आणला. नेवासा येथील ७०० वर्षांपूर्वीच्या पुरातन मंदिराचा विकास व ज्ञानेश्वरांच्या योग्यतेचे स्मारक व्हावे, यासाठी बापुसाहेब तनपुरे यांनी विधानसभेत चर्चा घडवून आणली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व तत्कालीन अर्थमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यावर सहमती दर्शविली. विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती प्रा.ना.स. फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासाला पहिली चालना मिळाली. याचे खरे श्रेय तनपुरे यांना लागेल.
हाडाचे शेतकरी असल्याने बियाणांमधील फसवणूक त्यांच्या जिव्हारी लागली. राहुरी तालुक्यातील बनावट कांद्याच्या बियाण्यांमुळे व अकोले तालुक्यातील बनावट टोमॅटोच्या बियाण्यांमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. काबाडकष्ट करून काळ्या आईची ओटी भरायची, पिक उभं करायचं आणि बियाणातील फसवणुकीमुळे मातीमोल भाव पदरी घ्यायचा. हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याने बळीराजावर संकटाची कुर्हाड कोसळू लागली. दि. १० जून २००४ रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे बापूसाहेब तनपुरे यांनी शासनाचे लक्ष वेधले. देशाचे कृषी मंत्री शरद पवार यांनाही साकडे घातले. त्यांची परिणती म्हणून बियाणे नियंत्रण कायदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
राज्यातील मागासवर्गीय लाभधारकांना शासनाच्या विविध योजनांसाठी असलेले दारिद्य्ररेषेच्या कार्डची सक्ती होती. तसेच मागासवर्गीयांनी कोणत्याही योजनेचा एकदा लाभ घेतल्यास पुन्हा इतर योजनांचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे अनुदान अखर्चित निधी म्हणून शासनाकडे परत जात होते. या दोन्हीही अटी रद्द करण्याचा निर्णय शासनाला घेण्यास भाग पाडले. त्यामुळे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील मागासवर्गीय समाजाचे हित जोपासणारे हे काम खर्या अर्थाने महत्वपूर्ण आहे. तीव्र दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे संकट राज्यातील बहुतांश गावांमध्ये निर्माण होते. विहिरी आटल्या, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बंद झाले की, शासन अशा गावांमध्ये पाण्याचे टँकर पाठवून तात्पुरती उपाययोजना केली जाते. मात्र पाण्याचे टँकर मंजूर करण्याचे अधिकार प्रांताधिकार्यांना असल्याने तहसीलदारांमार्फत प्रस्ताव पोहोचेपर्यंत गावातील महिला-भगिणींना पिण्याच्या पाण्यासाठी मैलौनमैल भटकंती करावी लागत असे. तनपुरे यांनी राज्यातील तीव्र दुष्काळ परिस्थिती, त्यावर करावयाची उपाययोजना, केंद्र शासनाकडून राज्यास मदत मिळण्यास होत असलेला विलंब याबाबत लक्षवेधी सूचना तसेच तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाने लक्ष वेधले. टँकर सुरू करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकार्यांऐवजी तहसीलदार यांना देण्याचा निर्णय शासनाला घ्यायला लावला. दुष्काळग्रस्त भागात लोकांना दरडोई देण्यात येणारे २० लिटर पाणी ४० लिटर करण्याची आग्रहाची मागणी तसेच रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.
राज्यातील जवाहर विहिर योजनांचे फळबाग योजनांचे थकवलेले अनुदान तातडीने अदा होण्यासाठी दि. २८ मे २००४ रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यानुसार शासनाला तातडीने अनुदान उपलब्ध करून देणे भाग पाडले. सर्व शेतकर्यांना या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. साखर कारखान्यांना पाटबंधारे विभागाकडून पुरविण्यात येणार्या पाण्यावर कालवा मुखाशी मोजमाप करून पाणीपट्टीची आकारणी करण्यात येत होती. हा प्रश्न उपस्थित करून कारखान्यांच्या साठवण तलावाच्या मुखाशी प्रत्यक्ष मिळालेल्या पाण्यावरच पाणीपट्टी आकारण्याच्या निर्णय शासनाला घ्यायला लावला. राज्यातील कारखानदारीला यामुळे मोठा दिलासा मिळाला. पतसंस्थांच्या कर्जाच्या रक्कमेवर आकारण्यात येणारे स्टॅम्प ड्युटी २ % करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ही वाढ अत्यंत जाचक असून याचा भुर्दंड कर्जदारांना होतो. यामध्ये कपात करून केवळ अर्धा टक्के स्टॅम्प ड्युटी आकारण्याचा निर्णय शासनाला तनपुरे यांनी घ्यायला लावला.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे १५ कोटी ५७ लाख रूपये खर्चाच्या जैव तंत्रज्ञान केंद्राच्या स्थापनेस शासनाने सन २००४-०५ च्या अर्थ संकल्पात मंजूरी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून दिला. हा प्रकल्प पूर्ण झाला असून संशोधन कार्य सुरू झाले आहे. विविध पिकांच्या कमी पाण्यात येणार्या तसेच खावरट जमिनीमध्ये येतील अशा, पण उत्पन्नात घट न करणार्या जाती निर्माण करणे, हे या प्रकल्पाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभारतांना मुलभूत गरजांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. वांबोरी पाईप चारीचे ९१. ५० कोटी रूपयांचे काम आणि भागडा पाईप चारीचे १७ कोटी ६२ लाख रूपयांचे काम ही कामे बापुसाहेब तनपुरे यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली आहेत.
वयाच्या ७१ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल, अशा उंदड उत्साहाने काम करतांना त्यांनी पाहिले, की तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासाठी अखंड कोसळणार्या प्रपाताची प्रचिती येते. बापूसाहेब तनपुरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राहुरीच्या शहराच्या विकासाची घोडदौड अशीच अखंड सुरु राहो, हीच सदिच्छा!