Breaking News

छत्रपती शंभूराजांची शौर्यगाथा चंद्र सूर्य असे पर्यंत अजरामर राहील -शिवशाहीर सुनील चिंचोलीकर


नेवासा, धर्मवीर छत्रपती शंभूराजांची शौर्यगाथा ही चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर राहिल तसेच धर्म व देशभक्तीबद्दल असलेली निष्ठा याबाबत समाजाला स्फूर्ती देत राहील असे प्रतिपादन नेवासा तालुक्यातील नजीकचिंचोली येथील शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांनी केले.

नेवासा येथे काशीविश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शौर्यगाथा शंभूराजांची हा पोवाडा सादर करतांना शिवशाहीर सुनील चिंचोलीकर हे बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, शिवसहकार सेनेचे उपप्रमुख बालेंद्र पोतदार, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते डॉ.शंकर शिंदे, पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार मकरंद देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.

जय जयकार महाराष्ट्राचा, शुर शिवबाचा। शंभु राज्याचा शौर्य सर सरले रोमारोमात,मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास हा पोवाडा सादर करतांना उपस्थित नागरिक यावेळी मंत्रमुग्ध झाले होते.
शंभूराजांची कीर्ती ही चंद्र सुर्य असे पर्यंत दाही दिशा गाजवित रहाणार आहे देशभक्ती व धर्मनिष्ठा काय असते हे शंभूराजांच्या चरित्रावरुन कळते त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन युवकांनी मनामनात देशभक्ती व धर्मनिष्ठा अंगी बाळगावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

हाल हाल करून क्रूरतेने शंभूराजांना छळले, अवहेलना केली गेली तरी ते देश व धर्मासाठी झुकले नाही,आपले बलिदान दिले अशी देशभक्ती व धर्मनिष्ठा शंभूराजांमध्ये होती त्यांच्या कार्यातून समाजाने व युवकांनी स्फूर्ती घ्यावी असे आवाहन ही यावेळी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून केले. पोवाडा कार्यक्रमाप्रसंगी पुरुष महिलांची व युवकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती