Breaking News

लोकसभेत टीडीपीचा गदारोळ केंद्रसरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव सादर नाही ; एनडीएच्या संख्याबळात घट

नवी दिल्ली : तेलुगु देसम पक्ष (टीडीपी), वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीने लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी केंद्र सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव सादर झाला नाही.



वायएसआर काँग्रेसचे वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी अविश्‍वास प्रस्ताव सोमवारच्या कार्यवाही यादीत समावेश करण्यासाठी लोकसभा सचिवांना पत्र लिहिले आहे. टीडीपीनेही अविश्‍वास प्रस्तावासाठी नोटीस दिली आहे. या प्रस्तावावेळी शिवसेना तटस्थ राहणार असल्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश राज्याचे वेगळे प्रश्‍न आहेत. अजूनपर्यंत आम्ही अविश्‍वास प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नसून उद्धव ठाकरे याचा निर्णय घेतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शुक्रवारी या दोन्ही पक्षांनी आणलेला अविश्‍वास प्रस्ताव सादर होऊ शकला नव्हता. शुक्रवारी विविध विरोधी पक्ष हे अनेक मुद्द्यांवर सभागृहात गोंधळ घालत होते. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस आता दुसर्‍या विरोधी पक्षांकडे अविश्‍वास प्रस्तावासाठी पाठिंबा मागत आहेत. अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान 50 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. काँग्रेस, डीएमके, सपाशिवाय डाव्या पक्षांनी अविश्‍वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र केंद्र सरकारला अविश्‍वास प्रस्ताव नामंजूर होण्याचा पूर्ण विश्‍वास आहे. लोकसभेत सध्या 539 सदस्य आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 270 खासदारांची आवश्यकता आहे. भाजपकडेच 274 खासदार आहेत. तसेच भाजपाला इतर काही पक्षांचेही समर्थन आहे. टीडीपीच्या 16 खासदारांनी राजीनामा दिल्यामुळे एनडीएचे संख्याबळ कमी झाले आहे.