Breaking News

महाराष्ट्राला आजपर्यंत 774 पद्म पुरस्कार

नवी दिल्ली : देशात आजपर्यंत 4 हजार 501 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, यामध्ये 45 भारतरत्न, 303 पद्मविभूषण, 1 हजार 241 पद्मभूषण आणि 2 हजार 912 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील 774 मान्यवरांचा समावेश आहे. देशात 1954 सालापासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कला, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, व्यापार व उद्योग, सामाजिक कार्य, वैद्यकशास्त्र, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

आजपर्यंत 45 मान्यवर व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला व खान अब्दुल गफार खान हे अभारतीय व्यक्ती आहेत,ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 1990 साली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( मरणोत्तर ) व नेल्सन मंडेला यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील 8 मान्यवर व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे,यामध्ये महाराष्ट्रातून स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर या एकमेव महिला आहेत तर देशातून 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
देशात आजपर्यंत 303 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मभूषण पुरस्काराने 1 हजार 241 तर पद्मश्री पुरस्काराने 2 हजार 912 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे. या पद्म पुरस्कारात देशातील 550 महिलांचा समावेश आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 132 महिलांचा समावेश आहे.
देशात आजपर्यंत प्रदान करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये 398 महिलांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 96 महिलांचा समावेश आहे. पद्मभूषण पुरस्कार आजपर्यंत 113 महिलांना प्रदान करण्यात आला आहे,यामध्ये महाराष्ट्रातील 28 महिलांचा समावेश आहे तर 34 महिलांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला,यामध्ये महाराष्ट्रातील 7 महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्राला आजपर्यंत 465 पद्मश्री, 242 पद्मभूषण, 59 पद्मविभूषण व 8 भारतरत्न, असे एकूण 774 पद्म पुरस्कार मिळाले आहेत.