Breaking News

सोड्डी दरोड्यातील ऐवजासह हत्यारे पोलिसांकडून जप्त

सोलापूर - सोड्डी येथे दोघांचा खून करून दरोडा टाकल्याप्रकरणातील संशयित वैजिनाथ उर्फ किशोर रामा भोसले (वय 21) याच्याकडून पोलिसांनी लुटलेला ऐवज जप्त केला. हत्यारेही हस्तगत केली. या दरोड्यात सातजणांचा सहभाग असल्याचेही चौकशीत आढळले. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. 8 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास संशयित वैजनाथ याच्यासह 7 जणांनी दारु प्राशन केले. त्यानंतर गावालगतच्या एका घरात चोरी केली. कस्तुराबाई बिराजदार यांच्या घरात प्रवेश केला. त्या जागे होऊन आरडाओरड करू नये म्हणून चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूहल्ला करून खून केला. त्यानंतर एका बंद घराचा दरवाजा तोडण्याच्या आवाजाने शेजारचे मलकप्पा रेवगोंडा बिराजदार हे जागे होऊन बाहेर आले. संशयितांनी त्यांना दगडाने ठेचून जखमी केले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. कस्तुराबाईच्या गळ्यातील 15 हजार रूपयांचे अर्धा तोळ्याचे 28 मणी असलेली माळ होती. तेमणी कामती बुद्रुक (ता. मोहोळ) येथील सुनीता शिवानंद रेवणकर वृद्धेला संशयितांनी बारा हजाराला विकले होते. पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, हवालदार दत्तात्रय तोंडले, सहाय्यक फौजदार एम.बी.जमादार, हरीदास सलगर, विठ्ठल साळुंखे यांनी तेथे जाऊन ते हस्तगत केले. तर खुनासाठी वापरलेली हत्यारे जामगाव येथून जप्त केली. संशयितांनी सोड्डी येथे दरोडा टाकण्यासाठी दोन मोटारसायकलचा वापर केला आहे. तसेच मोहोळ पोलिसांच्या ताब्यातील संशयिताला ताब्यात घेऊन तपास केला जाईल, असे तपासी अंमलदार प्रभाकर मोरे यांनी सांगितले.