Breaking News

आंजर्ल्यात 21 मार्चपासून कासव महोत्सव

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे येत्या 21 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मल सागरतट अभियान, आंजर्ले ग्रामपंचायत, वन विभाग, सह्याद्री निसर्ग मित्र आणि आंजर्ले येथील कासव मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम नुकताच संपला असून आंजर्ले येथे गेल्या दहा वर्षांत प्रथमच सर्वाधिक दहा कासवांनी आंजर्ले येथील समुद्रकिनारी अंडी घातली आहेत. या अंड्यांना कोल्हे, कुत्रे, रानडुक्कर यांच्यापासून धोका संभवतो. त्यासाठी आंजर्ले येथे संरक्षित घरटी करण्यात आली असून सर्वसाधारण 50 ते 55 दिवसांनी घरट्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात होते. यावर्षी सुमारे एक हजार 100 अंडी संरक्षित करण्यात आली असून त्यातून बाहेर येणा-या कासवाच्या पिल्लांना नैसर्गिक पद्धतीने समुद्रात सोडले जाणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी आंजर्ले येथे दरवर्षी पर्यटक येत असतात. त्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात ही संधी उपलब्ध होणार आहे.