Breaking News

जळितग्रस्त उबाळे कुटुंबास आर्थिक मदत


राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील भिमा उबाळे यांच्या राहत्या घराजवळ अभ्यासासाठी काढलेल्या रूमला अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या नातीचे सर्व शालेय साहित्य जळून खाक झाले. ही बातमी समजताच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या जिल्हाअध्यक्षा शैलजा साबळे यांनी या कुटुंबाला मदत करण्याची तप्तरता दर्शविली. 

साबळे यांनी या समितीचे शहराध्यक्ष गौतम कोळगे यांना पाहणी करून माहिती घेण्यास सांगितली. समितीच्या माध्यमातून काय मदत करता येऊ शकते, याबद्दल त्यांनी माहिती घेतली. त्या म्हणाल्या, कुठलीही घटना नकळत घडते, त्याला सामोरे गेले पाहिजे. दरम्यान, या सामाजिक संघटनेच्या उपक्रमातून सदर कुटुंबातील मुलीला कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘कणा’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा ‘लढ म्हणा’ याचा प्रत्यय आला. समितीच्या माध्यमातून या मुलीस आर्थिक मदत आणि शालेय साहित्याची भेट देण्यात आली. या भेटीने उबाळे कुटुंबिय हरखून गेले. या मुलीला खूप शिकविण्याचा या कुटुंबाचा निश्चय आहे. मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होतो. त्यामुळेच प्रचलित असलेल्या म्हणीत बदल करावासा वाटत असून शिक्षणाचे महत्व अगाध असल्याने यापुढे ‘जिच्या हाती शिक्षणाची शिदोरी ती कुटुंबाला उद्धरी’ असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया गौतम कोळगे यांनी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे प्रवर्तक तथा मार्गदर्शक प्रा. प्रविण कोळगे, जानमोहम्मद शेख, दिपक दिवे, किशोर पारखे आदी उपस्थित होते.