Breaking News

शेतकरी प्रथम प्रकल्पाचा अभ्यासदौरा उत्साहात


तालुक्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवित असलेल्या नवीदिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाचा बारामती येथे अभ्यासदौरा नुकताच आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या हस्ते या दौर्याला प्रारंभ झाला. प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांनी या अभ्यासदौर्याविषयी माहिती दिली. 

यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. कोकाटे म्हणाले, की अशा अभ्यासदौर्यातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल. दरम्यान, कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथील विविध प्रकल्पांना भेटी देऊन शेतकर्यांनी तंत्रज्ञान अवगत केले. यामध्ये विविध पीक प्रात्यक्षिके तसेच भाजीपाल्याचे सेंटर ऑफ एक्सलेन्स, माती परिक्षण प्रयोगशाळा, जैविक खतांची प्रयोगशाळा, मधुमक्षिकापालन, मत्स्यबीज केंद्र या प्रकल्पांना भेटी देऊन माहिती घेतली. तसेच आधुनिक डेअरी व्यवस्थापन, शेळीपालन, कुक्कुटपालन, जनावरांसाठी सायलेजमधून खाद्य निर्मिती, रोपवाटिका, कृषि यांत्रिकीकरण याविषयी माहिती घेतली. या अभ्यासदौर्यात कृषि अधिकारी रायभान गायकवाड, कणकरचे प्रगतशील शेतकरी भास्करराव वरघुडे आदींसह कणगर आणि चिंचविहिरे गावातील २५ शेतकरी व महिला सहभागी झाले होते. या दौऱ्यात मिळालेल्या ज्ञानाचा सदुपयोग करून तालुक्यात शेती विकसित करण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला. एकीकडे शेतकरी आत्महत्या होत असताना हा दौरा कमालीचा प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत श्रमात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही या दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी दिली. हा अभ्यासदौरा यशस्वी करण्यासाठी विजय शेडगे, आणि किरण मगर यांनी पुढाकार घेतला.