Breaking News

बदलणारी माणसे मोठे होत नाहीत : रामायणाचार्य हभप पाचपोर


जीवनात कृतीचे सातत्य ठेवणारा माणूसच मोठा होऊ शकतो. चांगल्या कामातून आदर्श निर्माण केला जात असतो. म्हणून बदलणारी माणसे कधीच मोठे होत नाहीत, असे प्रतिपादन विदर्भरत्न रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांनी केले. 

राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील श्री साई आनंद बहुउद्देशीय ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साईचरित्र पारायण’ आणि ‘अध्यात्माचा महाजागर’ या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या भाविकांना संबोधित करतांना ते बोलत होते. 

या प्रतिष्ठानने मागील पाच वर्षांपासून अध्यात्माचा महाजागरबरोबरच सामाजिक एकात्मतेचा संदेश देत विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सामाजिक कार्याबरोबरच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमातून वेगळेपण सिद्ध केले आहे. गावचे गावपण टिकावे, यासाठी गावात अध्यात्मिक क्षेत्रामध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने वरदविनायक सेवाधामचे मठाधिपती महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यातदेखील या प्रतिष्ठानने मोठे योगदान दिले आहे. दरवर्षी आयोजित केला जाणारा साईचरित्र पारायण आणि विविध उपक्रम या माध्यमातून अध्यात्माचा महाजागरबरोबरच यावर्षीचा कीर्तन महोत्सव आगळा वेगळा ठरत आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून अध्यात्माबरोबरच संतांचा परिचय या माध्यमातून करून दिला जात आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा हा उत्सव युवाशक्तीचा आणि ज्येष्ठ मंडळींचा ऐक्याचा संदेश देणारा ठरत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून संपन्न होणारा हा उपक्रम गावचे गावपण टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किर्तनकारांच्या माध्यमातून या उपक्रमाचे विशेष कौतूक केले जात आहे. कीर्तन महोत्सवामध्ये हभप पाचपोर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतूक केले.