श्रीरामपुरात सर्रास गुटखा मावा विक्री! ‘अन्न व औषध’चे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष
राज्यामध्ये गुटखाबंदी कायदा केलेला असताना श्रीरामपूरमध्ये मात्र या कायद्याचे कोठेही पालन होताना दिसत नाही. गुटखाबंदी कायदा धाब्यावर बसवून येथे सर्रासपणे गुटखा व मावा विक्री केली जात आहे. अनेक पानटपऱ्यांमध्ये खुलेआम मावा घासला जात आहे. १० ते २० रुपयांना मावा प्लास्टिक पिशवीत पॅकबंद करून विकला जात आहे. शहरात ठिकठिकाणी सर्रासपणे मावा विकला जात असताना अन्न व औषध प्रशासनाला माव्याचा सुगंध गोड लागत आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात कोठेही पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, छोटी मोठी किराणा दुकाने यामधून सहजासहजी गुटखा मिळत आहे. काही टपऱ्यांवर मावा विक्रीचे फलक लागले आहेत. बसस्थानक परिसरात कोठेही सहजासहजी गुटखा व मावा मिळत आहे. मेन रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, शिवाजी चौक परिसर, गल्लीगल्लीतली काही किराणा दुकाने, वॉर्ड नंबर दोन, बसस्थानक परिसर, भगतसिंग चौक, सय्यदबाबा चौक, कर्मवीर चौक, तहसील- तलाठी कार्यालय परिसर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपरिषद परिसर आदी ठिकाणी खुलेआमपणे गुटखा तसेच मावा विक्री होत आहे. डायमंड नामक गुटख्याच्या दहा रुपयांच्या दोन ते तीन, हिरा दहा रुपयास दोन याप्रमाणे इतरही वेगवेगळ्या नावाच्या गुटख्यांची विक्री सर्रासपणे सुरु आहे. तसेच माव्याच्या पुड्यांची दहा, वीस रुपयांप्रमाणे विक्री चालू आहे. पानटपऱ्यांजवळचा परिसर तसेच रस्त्यारस्त्यांवर गुटख्याच्या रिकाम्या पुड्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. ठिकठिकाणी गुटखा,मावा खाऊन पिचकाऱ्या मारून रस्ते घाण करण्याचे काम काही महाभाग करत आहेत. सर्वत्र सर्रासपणे गुटखा, मावा विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासन त्यांच्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत आहे. खुलेआमपणे गुटखा विक्री करणाऱ्यावर एफडीए व पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही, असा सर्वांनाच अंतर्मुख करणारा सवाल येथील जनतेतून उपस्थित होत आहे.