Breaking News

प्रशांत गडाख यांना ज्ञानरत्न तर उध्दव सोनवणे यांना ज्ञानगौरव पुरस्कार प्रदान

नेवासा येथील ज्ञान फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा 2018 चा ज्ञानरत्न पुरस्कार यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना तर ज्ञानगौरव पुरस्कार कौठा येथील मुख्याध्यापक उद्धव सोनवणे यांना बुधवारी नेवासा येथे सायंकाळी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात प्रदान करण्यात आला. ज्ञानी माणसाचे ज्ञान हे कर्माशी जोडले पाहिजे. ज्ञान हाच जीवनाचा खरा पाया आहे. कर्माशी जोडलेल्या ज्ञानाची उमटलेली मोहोर म्हणजे हा पुरस्कार असल्याचे प्रतिपादन आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान कमिटीचे विश्‍वस्त अभय टिळक यांनी केले.

या दोन्ही पुरस्कारांचे वितरण बुधवारी सायंकाळी नेवासा शहरातील मराठा बोर्डिंगच्या प्रांगणात पार पडले. आळंदी देवाची येथील श्री. ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक यांच्या हस्ते व आळंदी येथील अमृतनाथ स्वामी मठाचे मठाधिपती महंत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, झी. टॉकीजवरील गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता हेमंत पांचाळ यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर गंधारे यांनी स्वागत केले. प्रा. देविदास साळुंके यांनी पुरस्कर्त्यांच्या कार्याचा परीचय करून दिला. यावेळी बोलताना टिळक म्हणाले की, ज्ञानाचे संवर्धन प्रचार व प्रसार झालेले हे क्षेत्र आहे. व्यक्तिमत्वाच्या पायाभरणीचे काम ज्ञान फाउंडेशनने या पुरस्काराच्या माध्यमातून केले आहे. एकवीसावे शतक हे ज्ञानाचे असून मानवी सक्षमीकरणाचे ज्ञान हे आत्मसाधन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना प्रशांत गडाख म्हणाले की, सामाजिक काम करत असताना अनेक अडचणी आल्या. अनेकांच्या टिकेला टीकेला सामोरे जावे लागले.पण हे काम करत असताना अनेक तरुणांचे हात व ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळाले. व्यक्ती महत्त्वाची नसून प्रतिष्ठान महत्त्वाचे आहे. तरुणांना आवडतील अशा असंख्य गोष्टी सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून करता येईल. खूप चांगले उपक्रम तालुक्यात करता येऊ शकतात. उपक्रमशील तरुणांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी प्रा. सुनील दानवे यांनी सूत्रसंचालन, तर निलेश खंडाळे यांनी आभार मानले. माऊलीच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आण्णा देवढे, विजय गायकवाड, श्रीपाद कुलकर्णी, आदेश टेकाळे, गणेश यादव, किशोर बोर्डे, स्वप्निल कांदे, आदित्य खंडाळे, प्रशांत डाके, अमोल रणमले, हर्षल कडू, विलास वीर, घनशाम पाटील, उमेश शीलवंत, महेश देवढे, संदीप वीर, निलेश खंडाळे, अजिंक्य नांगरे, अक्षय खंडाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.