Breaking News

पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी उदासीन भुमिका घेणार्‍या प्रतिकात्मक केंद्र व राज्यसरकाररुपी दगडांना इंजेक्शन देवून निषेध


घरकुल वंचितांना हक्काचे घरे मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्याकरिता उदासीन भुमिका घेणार्‍या प्रतिकात्मक केंद्र व राज्य सरकाररुपी दगडांना इंजेक्शन देवून मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर राज्यात लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याची आग्रह मागणी करण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकित आगळ्या वेगळ्या पध्दतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी अ‍ॅड.कारभारी गवळी, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, एकनाथ राऊत, भाऊसाहेब भोसले, जसवंतसिंग परदेशी, अंबिका नागुल, देवीदास पवार, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, सखुबाई बोरगे आदिंसह शहर व उपनगरातील घरकुल वंचित उपस्थित होते.

घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने साडेतीन वर्षा पासून आंदोलने चालू आहेत. यासाठी केंद्र व राज्य सराकारकडे सातत्याने पाठपुरावा चालू असून, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. जागा व आर्थिक निधी अभावी ही योजना रखडली असून, ही योजना राबविण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजनेशिवाय पर्याय नसल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून खडकाळ आणि नापिक जमीन असलेल्या मालकांना आजच्या बाजारभावापेक्षा चार पटीने मोबदला मिळणार आहे. सरकारला तिजोरीवर अधिक ताण न पडता ही योजना यशस्वी होणार आहे. जगातील अनेक प्रगत देशांनी या योजनेचा अवलंब केला असून, त्यांच्यापुढील घरकुल वंचितांचे प्रश्‍न सुटले आहे. देशात घोषणांचा सुकाळ आहे तर अंमलबजावणीचा खळखळाट असल्याची शोकांतिका प्रकाश थोरात यांनी मांडली. सरकार घरकुल वंचितांकडे लक्ष देणार नसेल, तर त्यांना झोपेतून जागविण्यासाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.