Breaking News

संकलित मूल्यमापन चाचणी शाळास्तरावरच घेण्याचा निर्णय


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरणद्वारा राज्यस्तरावर घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी रद्द झाली असून, शाळांनी त्यांच्या स्तरावरच चाचण्यांचे आयोजन करण्याचे पत्र आज विद्या प्राधिकरण ने निर्गमित केले आहे. या प्रश्‍नासाठी शुक्रवार दि.09 मार्च रोजी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. या मागणीला आखेर पाठपुराव्याने यश मिळाल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

राज्यस्तरावरून संकलित मूल्यमापनाच्या चाचणी परीक्षा रद्द करून शाळास्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात यावे यासाठी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महीला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, सर कार्यवाह नरेंद्र वातकर व कोषाध्यक्ष किरण भावठणकर यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची शुक्रवारी मंत्रालयात भेट घेऊन पायाभूत व संकलित चाचण्या रद्द करण्याची मागणी केली होती. शिक्षणमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या अनुषंगाने विद्या प्राधिकरणाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती तयार केल्या आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने महाराष्ट्रातील अभ्यासक्रमास अनुसरून सदर अध्ययन निष्पत्ती मध्ये बदल करून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्ती तयार केल्या आहेत. तसेच भारत सरकारच्या सूचनेनुसार यापुढे होणारी सर्व राष्ट्रीय संपादणूक व राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणे अध्ययन निष्पत्ती आधारित करावयाची आहेत. सदर बदल राज्यस्तरावरून करण्यात येण्यासाठी शिक्षण विभागाला तयारी करणे गरजेचे आहे. यामुळे शाळांनी त्यांच्या नियोजनाप्रमाणे संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याबाबत विद्या प्राधिकरणाने शाळांना सूचना दिल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष बोडखे यांनी प्रसिध्दीपत्रकात सांगितले आहे.

या निर्णयामुळे ज्या शाळांमध्ये विद्या प्राधिकरणाने निश्‍चित केलेली संकलित मूल्यमापन व शाळा स्तरावरची परीक्षा अशा दोन-दोन परीक्षांना सामोरे जाण्याचा विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार असून, शिक्षकांना देखील दोन परिक्षांऐवजी एकाच परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार असल्याने शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी होणार आहे. या निर्णयाचे शिक्षक परिषदेचे नाशिक विभागाध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, नगरचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, ग्रामीण अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष शशिकांत थोरात, विनायक कचरे, सचिव तुकाराम चिक्षे, चंदकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, प्रा.सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ.अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य आदींनी स्वागत केले आहे.