Breaking News

पुण्यातील सर्व धरणे भरली, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सोलापूर, दि. 01, सप्टेंबर - उजनी धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून 45 हजार 400 क्सुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.  धरणाची उपयुक्त पाण्याची टक्केवारी 99.67 इतकी होती. दौंड येथून धरणात 70 हजार 399 क्युसेक्सने पाणी मिसळत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यामुळे त्या धरणांतून नदीपात्रामध्ये  पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येत असल्यामुळे धरण 100 टक्के भरत आहे. दुपारी चार वाजता 99.67 टक्के असलेले धरण काही तासांमध्ये 100  टक्के भरेल. धरणात मागील वर्षी 61.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा धरण खूपच लवकर 100 टक्के भरले आहे
धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाने मंगळवारीच दिला होता.  बुधवारी दुपारपासून जवळपास 41 हजार 500 क्युसेक्सने पाणी भीमा नदीमध्ये सोडले जात आहे. कालव्यातून तीन हजार, बोगद्यातून 900 क्सुसेक्सनेही पाणी  सोडले जात आहे. दौंड येथून येणारा विसर्ग जास्त असल्यामुळे नदीपात्रात किंवा कालव्यात पाणी सोडण्याचा वेग वाढविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील वर्षी धरण भरूनदेखील पाण्याचे नियोजन न झाल्याने धरणाची स्थिती खालावली होती. चालू वर्षी तरी पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, धरणावर सक्षम  अधिकारी नेमावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.