Breaking News

कराड तालुक्यातील डॉ. कु. स्वप्नाली शांताराम बर्डे यांना पीएचडी

पदवीदान समारंभात स्वीडनच्या राजे-राणीच्या हस्ते होणार सत्कार  

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : जागतिक किर्तीच्या विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन केलेल्या 100 ते 125 विद्यार्थ्यांमधून दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना स्वीडनचे राजे व राणीसाहेब यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात येते. तो बहुमान यावेळी डॉ. कु. स्वप्नाली शांताराम बर्डे या कन्येच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. कु. स्वप्नाली बर्डे या मूळच्या उंब्रज (सातारा) येथील परंतु सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या बांधकाम उद्योगपती डॉ. शांताराम बर्डे व स्नेहल बर्डे यांच्या कन्या आहेत. पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेजमधून बी. फार्मसी झाल्यानंतर त्या उच्च शिक्षणाकरिता स्वीडन येथे गेलेल्या आहेत. त्यांनी एम. एस. करुन ह्युमन न्युरो सायन्समध्ये ’डिप्रेशन’ या विषयांवर औषधासाठीच्या सादर केलेल्या शोधप्रबंधास नुकतीच स्वीडनमधील कॅरोलिन्स्का युनिव्हर्सिटीने मान्यता दिली आहे.
पीएचडीच्या मानकरी असलेल्या 100 ते 125 विद्यार्थ्यांमधून दरवर्षी ज्यांनी अपवादात्मक शोधप्रबंध सादर केलेले आहेत, अशा 20 विद्यार्थ्यांना स्वीडनच्या राजेसाहेब आणि राणीसाहेब यांच्या हस्ते पदव्यांनी सन्मानित करण्यात येते. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोममध्ये जगविख्यात नोबेल हॉलमध्ये होणार्‍या या पदवीदान समारंभासाठी डॉ. कु. बर्डे यांची निवड झाली आहे. हा समारंभ जुलै 2017 मध्ये होणार आहे. या संशोधनाकरिता डॉ. कु. बर्डे यांना जगविख्यात न्युरो शास्त्रज्ञ डॉ. व्हॉकफेल्ट थॉमस व रोशालिस् यांचे मार्गदर्शन लाभले. अशा प्रकारचा शोध प्रबंध त्यांनी न्युरोसायन्स प्रमाणेच गायनॅकॉलॉजी (स्त्रीरोग) मध्ये तयार करावा असे कॅलिफोर्निया सरकारने त्यांना सुचविले आहे, ही देखील सातारा जिल्ह्याचा गौरव वाढवणारी बाब आहे.