Breaking News

रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी मंजूर : डॉ. विखे


शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १४ रस्त्यांच्या कामांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नामुळे ४३ कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे, अशी माहिती डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

डॉ. विखे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी शिर्डी मतदारसंघात प्रभावीपणे केली जाते. वैयक्तिक लाभाच्या योजनांबरोबरच सार्वजनिक विकासाच्या कामांनाही प्राधान्य देवून मतदारसंघात विरोधी पक्षनेते विखे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची प्रक्रिया निरंतर सुरु आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना सदैव प्राधान्यक्रम दिला जातो. गावापासून ते मुख्य रस्त्याला जोडल्या जाणार्‍या रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी विरोधी पक्षनेते विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी विखे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. मतदारसंघातील एकूण १४ रस्त्यांच्या कामांसाठी ४३ कोटी रुपयांच्या निधीची सर्वाधिक तरतूद अर्थसंकल्पात झाली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या कामांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असतो. या व्‍यतिरिक्‍त मुख्‍यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्‍हा परिषद, व अन्‍य स्‍त्रोंताकडून अधिकचा निधी उपलब्‍ध करुन ग्रामीण भागातील जास्‍तीत जास्‍त रस्‍त्‍यांची कामे मार्गी लावण्‍याचा प्रयत्‍न आहे. गावपातळीवर ग्रामस्थांच्या मागणीचा प्राधान्यक्रम ठरवूनच विकासकामांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.