Breaking News

‘सावली’तर्फे महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन


महिलादिनानिमित्त बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यशाळेत आश्वी बुद्रुक येथील सावली फाउंडेशनतर्फे सॅनेटरी नॅपकिनबाबत जनजागृती करण्यात आली. या नॅपकिनची माफक दरात विक्रीदेखील करण्यात आली. आश्वी बुद्रुक येथील सुनंदा गोडगे, वर्षा गांधी, सुवर्णा वर्पे, मंगल पेटारे, प्रितम जाधव, रूपाली गोडगे यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. सदर संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. 

यानिमित्त बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘महिलांचा आहार व आरोग्य’ या विषयावर कार्यशाळा झाली. त्यात ‘सावली’तर्फे मासिक पाळीबाबत समज गैरसमज, या अनुषंगाने उद्भवणारे विविध प्रश्न, आजार, स्वच्छतेचे महत्त्व, सॅनिटरी नॅपकीनच्या वापराचे फायदे याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. सावलीच्या स्टॉलला ४०० महिलांनी भेट देत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, श्रीरोगतज्ञ डॉ. सुरेखा तायडे, डॉ. विद्याधर बंगाळ, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, पंचायत समितीच्या सभापती हिरा कातोरे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते, कविता लहारे, पंचायत समिती सदस्या नंदा तांबे, संतोष ब्राम्हणे, कृषी विज्ञान केंद्रातील विस्तार विभाग प्रमुख सुनील बोरुडे आदींनी या उपक्रमाचे कौतूक केले.