Breaking News

न्यायालयात महिला दिन साजरा


नेवासा /शहर प्रतिनिधी/- महिलांवर अत्याचार करणे म्हणजे कर्तबगारी नव्हे तर कमजोरी असल्याचे वक्तव्य नेवासा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व अति सत्र न्या.ए.एल.टिकले यांनी केले.

ते जागतिक महिलादिन निमित्त नेवासा न्यायालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. व्यासपीठावर वरिष्ठ स्तर दिवाणी न्या.पी.व्ही.बुलबले ,न्या. एम.वाय. डोईफोडे, न्या.ए.जी.देशिंगकर, न्या. पी.व्ही.राऊत, वकील संघाचे अध्यक्ष अँड. भैयासाहेब झावरे, तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी मुंढे, प्रा. संजीवनी भालसिंग, अँड.के.एच.वाखुरे, अँड.एस.पी.शिरसाठ, अँड.बिंगी आदी उपस्थित होते.

न्या.टिकले पुढे बोलताना म्हणाले की, महिला खऱ्या अर्थाने कर्तबगार आहेत. कारण त्या त्यागी वृत्तीच्या असतात. छोट्या मोठ्या कारणावरून त्या टोकाचा निर्णय घेत नाहीत कारण त्यांना मुलांची, आई, वडील, भाऊ, बहीण यांची काळजी असते. महिला सोशिक आहेत म्हणजे त्या कमजोर आहे असे मुळीच नाही. त्या परिस्थितीशी जुळवून घेत असतात एव्हढेच. सुशिक्षित म्हणजे कर्तबगार असेही नाही. तर प्रतिकूल परिस्थितीतही ज्या महिला मुलांना शिकून मोठे व संस्कारी बनवतात त्या खऱ्या कर्तबगार असेही न्या.टिकले म्हणाले. कौटुंबिक हिंसाचरपासून महिलांचे संरक्षण व हुंडा प्रतिबंधक कायद्यावर मार्गदर्शन करताना न्या. डोईफोडे म्हणाल्या की, महिलांनी माहेरकडील मिळकतीमधील हक्क सोडून देताना आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. व ज्या अन्यायग्रस्त महिला आहेत. त्यांनी मोफत विधी सेवेचा लाभ घेतला पाहिजे. प्रा.,संजीवनी भालसिंग यांनी महिलांचे सक्षमीकरण याविषयावर बोलताना प्रत्येक महिलेने स्व ची ओळख करून दिली पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविक व स्वागत अँड.के.एच.वाखुरे यांनी केले. तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी मुंढे यांनी मनोगत व्यक्त केले