Breaking News

सातार्यात चारचाकी विनाचालक धावली, एक गंभीर जखमी


सातारा, दि. 12, मार्च - उतारावर उभी केलेली चारचाकी अचानक सुरू झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. ही विनाचालक चारचाकी सुमारे पाचशे फूट धावत गेल्यानंतर एका दुचाक ीस्वाराला धडक देऊन ट्रकवर आदळली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून, हा थरार येथील पोवईनाक्यावर घडला.पोवईनाक्यावर सैनिक बँकेसमोरील तीव्र उतारावर एक चारचाकी चालक गाडी उभी करून मित्राला लग्नपत्रिका देण्यासाठी गेला. काही क्षणातच चारचाकी रस्त्यावरून धाऊ लागली. चारचाकीमध्ये चालक नसल्याचे काही नागारिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली.वाढे फाट्याकडून येणार्या वाहन चालकांनी समोरून चारचाकी येत असल्याचे पाहून पाठीमागे वाहने घेतली. उतारावर असल्यामुळे त्या चारचाकीचा वेग अचानक वाढला होता. डाव्या बाजूने निघालेली चारचाकी अचानक उजव्या बाजूला वळली.त्यामुळे समोरून येणार्या एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक देऊन पुन्हा ती चारचाकी उभ्या असलेल्या मालट्रकवर जाऊन आदळली. केवळ वीस ते पंचवीस सेकंदामध्ये हा थरार घडला. काही नागरिकांनी भितीने वाहने रस्त्यात सोडून आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. चारचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या नागरिकाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जमावाला पांगवून रस्त्यावर असलेली चारचाकी पोलिसांनी बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. उतारावर चारचाकी उभी करताना चालकाने हँडब्रेक लावला नव्हता. त्यामुळे चारचाकी सुरू झाली असावी अशीशक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.