Breaking News

पोषण आहाराच्या निधीसाठी सरकारकडून टाळाटाळ


मुंबई : पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला.पोषण आहारासंदर्भात लक्षवेधीवर चर्चा होत असताना विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबीत असलेला पोषण आहाराचा निधी कधी देणार, अशी विचारणा महिला व बालकल्याण मंत्र्यांना केली. अंगणवाडी सेविका पदरचा पैसा खर्च करून ही योजना राबवत आहेत. परंतु, निधीची तरतूद करूनसुद्धा सरकार पोषण आहाराचे पैसे उपलब्ध करून देण्याबाबत उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना आम्ही सरकारकडे पुरवणी मागणी केली आहे. परंतु, अद्याप निधी न मिळाल्याचे मंत्र्यांनी सभागृहात सां गितले. या उत्तरावर विखे पाटील यांनी आक्षेप घेतला. पोषण आहाराचा निधी हा नियमित योजनेचा भाग असून, त्याला पुरवणी मागणीची गरजच काय? कुपोषण निर्मूलन हा प्राधान्याचा मुद्दा असताना पोषण आहारासाठी पैसा का उपलब्ध होत नाही? अशी प्रश्‍नांची झड त्यांनी यावेळी लावली. कुपोषण व बालमृत्युंमुळे महाराष्ट्राची प्रतीमा मलीन होत असतानाही सरकार यासंदर्भात संवेदनशील नसल्याचे सांगून विखे पाटील यांनी विरोधी पक्ष विधानसभेतून सभात्याग करीत असल्याचे सांगितले.