Breaking News

आत्मा कधीच भेदभाव करीत नाही : परमानंद महाराज


सर्वांचा निर्माता एकच आत्मा आहे. येथे कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही. गरीब- श्रीमंत भेदभाव नाही. आत्म्याला जात धर्म, पंथ नसतो. गुरुदेवांच्या रूपाने परमात्मा आपल्या समवेत आहे. आत्मा कधीच भेदभाव करीत नाही, असे प्रतिपादन संत परमानंद महाराज यांनी केले. 
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालिक ध्यानपिठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवशीय चैत्र महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहील्या सत्रातील सत्संग कार्यक्रमाप्रसंगी संतपिठावर प. पू. आत्मा मालिक माऊली, संत देवानंद महाराज, माजी मंत्री मधुकरराव पिचड, कमलताई पिचड, नगराध्यक्ष विजय वहाडणे, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे आदींसह संत मंडळी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरूवारी {दि. २९} पहाटे सहा वाजल्यापासून सामुदायीक योगा, प्राणायम, ध्यान शिबिर घेण्यात आले. योग प्रशिक्षक अभिजीत शहा यांनी मानवाच्या विविध आजारावर मात करण्यासाठी योगा प्राणायम कसे गरजेचे आहे, हे प्रात्यक्षिकातून पटवून दिले. यावेळी इंदोर, उत्तरप्रदेशचे केदार सारडा यांनी उपस्थित भाविकांना आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन करून प्रबोधन केले. ध्यान, सत्संग व इतर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, बाळासाहेब गोर्डे आदींसह सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक, सेवक, भाविक यांनी परिश्रम घेतले.