Breaking News

जुन्या तहसील कार्यालयामागील दुचाकींना लागली आग


तहसील कार्यालयाच्या मागे विविध गुन्ह्यातील पकडून आणलेल्या 5 ते 6 मोटारसायकलींना अचानक आग लागली. आगीमध्ये जळून मोटारसायकली खाक झाल्या. सदरची आग जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामन बंबाने अटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. यापूर्वी दोन वर्षापुर्वी देखील येथील 17 गाड्यांना आग लागली होती. मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही.
 
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पुर्वी जामखेड तहसिल कार्यालय व जामखेड पोलिस स्टेशन हे एकाच आवारात होते. यामुळे अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांसंबधी जवळ जवळ 50 ते 60 दुचाकी गाड्या या आवारातील तहसील कार्यालयामागे जामखेड पोलिसांनी ठेवलेल्या होत्या. त्यापैकी काही गाडया नवीन पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या तर काही दुचाकी अनेक वर्षांपासून जुने तहसील कार्यालयात पडून असल्याने त्यांच्यावर गंज चढून खराब झाल्या आहेत. याकडे तहसील व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. 
याबाबत दि. 12 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या पाठीमागे अचानक धूर निघत असल्याचे निलेश शिंदे, दत्ता घुमरे या युवकाच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी प्रभारी तहसीलदार विजय भंडारी यांना सदर माहिती दिली. भंडारी यांनी तातडीने जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलास बोलविण्यात आले. ही लागलेली आग अटोक्यात आणली. यामध्ये एकूण 5 ते 6 मोटारसायकली जळून खाक झाल्या.
या परीसरात जवळच स्वतंत्र पुर्वीचे संपूर्ण तालुक्याचे महत्वाचे दस्तावेज (रेकॉर्ड) रूम व संपूर्ण तालुक्याची सात बारा व आठ अ चे नोंदी असलेली संगणक रूमही जवळच आहे. सुदैवाने या दोन्ही खोल्यांचे नुकसान झाले नाही. या ठिकाणी स्वच्छतागृह असल्याने अनेक लोक लघुशंके साठी जातात. यामुळे अज्ञात व्यक्तीने धुम्रपान करून सिगारेट ओढून टाकली कींवा शेजारी असलेला कचरा पेटवल्याने ही आग लागली असल्याचा आंदाज नागरिकांनी वर्तविला आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही. दोन वर्षांपुर्वी देखील अशाच पद्धतीने याच ठीकाणी अशा मोटारसायकलींना आग लागली होती. यामध्ये एकूण 17 मोटारसायकल जळून खाक झाल्या होत्या.