लोकप्रतिनिधींचा अपमान करणार्या अधिकार्यावर कारवाई करा - दादा साईल
कुडाळ तालुक्यात अणाव घाटचे पेड इथ पणदूर इथल्या एका सोसायटीने टाकलेल्या शौचालयाच्या टाकितला मैला प्रकरणी पंचनाम्यासाठी गुरुवारी सायंकाळी आलेल्या ओरोस पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक संजय भोसले यांचा लोकप्रतिनिधींशी बोलताना तोल सुटला. लोक प्रतिनिधींशी हुज्जत घालताना तुमच क्वालिफिकेशन काय ? तुम्ही माझी फक्त बदली करू शकता असे बोलून हे महाशय लोकप्रतिनिधींच्या अंगावर धावून गेले.
या ठिकाणी पणदूर सरपंच दादा साईलच नव्हे तर कुडाळचे सभापती राजन जाधव, प.स. सदस्य जयभारत पालव, अणावचे सरपंच नारायण मांजरेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. आणि त्यांच्या समोरच हे अधिकारी महाशय तावातावाने बोलत होते. त्यामुळे या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पणदूरचे सरपंच आणि महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ सिंधुदुर्गचे जिल्हा सरचिटणीस तुकाराम उर्फ दादा साईल यांनी केली.
खरतर मैला प्रकरणाबाबत पोलीस खात्याने पंचनामा केल्याशिवाय आरोग्य विभागाला आपली कार्यवाही करता येत नाही. पण याबाबतची तक्रार 28 फेब्रुवारीला करून सुद्धा आणि लोकांच्या आरोग्यबाबतचा प्रश्न असून सुद्धा पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले दुसर्या दिवशी म्हणजेच 1 मार्चला पंचानाम्यासाठी आले. त्याबद्दल प स सदस्य जयभारत पालव यांनी विचारणा केली असता भोसले साहेबांचा पार चढला आणि अगदी त्यांनी लोक प्रतिनिधींनी देश विकायला काढलाय अशा शब्दात लोक प्रतिनिधींचा अपमान केला. दरम्यान ओरोसचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी याबद्दल दिलीगिरी व्यक्त करून या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकलाय. पण आता सरपंच संघटनेन हे प्रकरण लावून धरलय. त्यामुळे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम या प्रकरणी कोणती भूमिका घेता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.