Breaking News

सरकारकडून संसदेच्या स्थायी समितीचे अवमुल्यन तृणमूल काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणावर संसदेच्या स्थायी समितीची चर्चा अजून पूर्णही झालेली नसताना केंद्र सरकार एअर इंडियाच्या खासगीकरणाचा आराखडा घोषित करत आहे, असे मत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी व्यक्त केले आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारकडून संसदेच्या स्थायी समितीचे अवमुल्यन होत आहे, असे सुचित केले. डेरेक ओब्रायन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, एक एक करून प्रत्येक संस्थेशी तडजोड केली जात आहे. आता तर संसदेची स्थायी समितीदेखील यातून सुटली नाही. संसदेच्या स्थायी समितीची एअर इंडियाच्या विषयावरील चर्चा पूर्णही झालेली नसताना सरकार एअर इंडियाच्या खासगीकरणाची घोषणा करत आहे. तसेच त्यांचे मंत्री त्या विषयीचे तपशील देत आहेत. यावेळी त्यांनी कार्यकारी गटाकडून लोकशाहीचे अपहरण होत आहे का? असाही प्रश्‍न उपस्थित केला.

या अगोदर 28 मार्चला केंद्र सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाच्या प्रक्रियेत सल्लागार म्हणून ’अर्न्स्ट अँड यंग एलएलपी इंडिया’ची (ईवाय) नेमणूक केली होती. या समितीकडे एअर इंडियाच्या व्यवस्थापनाचे हस्तांतरण आणि सरकारच्या 76 टक्के समभागाची (शेअर) विक्री या जबाबदार्‍या देण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबर 2017 ला एअर इंडियाचे अधिकृत भांडवल 300 कोटी एवढे होते. या भांडवलाची प्रत्येकी 10 रुपयाच्या समभागात विभागणी करण्यात आली होती. तसेच 267 कोटीचे देयक समभाग स्वरुपातील भांडवल राष्ट्रपतींच्या नावे होते. एअर इंडिया भारतातील सर्वात विस्तृत स्वरुपाची विमान सेवा कंपनी आहे. तिचे 93 राष्ट्रीय ठिकाणांवरील थांबे, 54 स्थानिक थांबे असून हप्त्यातून 2 हजार 330 वेळा उड्डाण होते. तसेच 39 आंतरराष्ट्रीय थांबे असून तेथे हप्त्यातून 766 उड्डाणे होतात. एअर इंडियाचे अनेक विदेशी विमान सेवा कंपन्यासोबत जवळजवळ 19 क रार झाले असून त्या अंतर्गत आणखी 52 ठिकाणांवर थांब्याची व्यवस्था उपलब्ध आहे.