Breaking News

अर्वाचिन काळातही संस्कृतचे महत्त्व कमी झाले नाही : डॉ. लीना रस्तोगी

संस्कृत भाषेच्या साहित्य निर्मीतीचा प्रवाह अव्याहत असून ही भाषा मृतप्राय झालेली नाही. कालौघात होत असलेल्या स्थित्यंतरातही संस्कृतचे महत्त्व कमी झालेले नाही, असे मत प्रख्यात संस्कृत तज्ज्ञ डॉ. लीना रस्तोगी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर संस्कृत विभागातर्फे प्रज्ञाभारती डॉ. श्री.भा वर्णेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सांप्रतिककाले अर्वाचिन संस्कृत साहित्यस्य महत्त्वम्’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.  व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदूस्तान समाचारचे संचालक अरविंद मार्डीकर व संस्कृतच्या विभागप्रमुख डॉ. शुचिता दलाल उपस्थित होते. 

संस्कृत भाषेतून व्याख्यान देताना पुढे त्या म्हणाल्या की, अर्वाचिन संस्कृत साहित्यामध्ये अनेक कवि-कवियत्री आहेत. त्या विविध रचनांची निर्मितीही करीत आहेत. आज साहित्य निर्मितीचे स्वरुप बदलले असून संस्कृतमध्येही गझल-भावगीतांची रचना होत आहे. त्या अनुषंगाने संशोधन व्हायला हवे, असे मत डॉ. लीना रस्तोगींनी व्यक्त केले आणि असे संशोधन झाले तर ती डॉ. श्री.भा. वर्णेकरांना जन्मशताब्दीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकेतून डॉ. शुचिता दलाल यांनी अर्वाचिन संस्कृत साहित्याचा कालखंड विशद केला आणि जन्मशताब्दी उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थिनींनी विद्यापीठ गीत सादर केले. संचालन मृणालिनी उपाध्याय यांनी संस्कृत भाषेतून केले. आभार प्रतिभा परेटकर यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. श्री.भा वर्णेकरांचे सूपूत्र श्रीनिवास वर्णेकर, चंद्रगुप्त वर्णेकर यांचेसह नरेश पांडे, नारायण जोशी, तनुजा वाघमारे, विभागातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.