Breaking News

‘जाब विचारता येईल, त्यालाच मत’


शहरात कला, क्रिडा, समाजसेवा, संगीत, नाट्य, उद्योग, व्यापार, शिक्षण, साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रांत नेत्रदीपक कार्य होत आहे. तथापि गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचार यामुळे राजकारण मात्र समाजाच्या घृणा आणि तिरस्काराचा विषय बनले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आगामी महापालिका आणि इतर सर्वच निवडणुकांच्या अनुषंगाने ‘ज्याला जाब विचारता येईल, त्यालाच मत’ हे अभियान राबविण्याची नगरमध्ये आवश्यकता आहे, अशी भावना विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
येथील जागरूक नागरिक मंचचे निमंत्रक सुहास मुळे यांच्यातर्फे स्नेहालय संस्थेच्या स्नेहांकुर उपक्रमाला वाहन भेट देण्यात आली. वापरायोग्य अशी स्कोडा कंपनीची ‘ओपल अॅष्ट्रा’ हे वाहन विकण्याऐवजी स्नेहांकुर उपक्रमासाठी मुळे यांनी दिली. त्यामुळे समस्याग्रस्त बालके आणि महिलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ झाला, अशी प्रतिक्रिया स्नेहांकुरच्यावतीने व्यक्त करण्यात आली. 

यावेळी जागरूक नागरी मंचाचे प्रमोद देशपांडे, वैभव कासुरे, विष्णू सामस, शरद मडूर, राजीव शितोळे, अमृतलाल बोरा, राधिका कुकडे, कैलास दळवी, नंदप्रकाश शिंदे, दगडू गराडे, धनेश बोगावत, विजयसिंह होलम, राजकुमार जोशी, राजेश टकले, स्नेहांकुर परिवारातील नाना बारसे, बाळासाहेब वारुळे, संगीता शेलार आदी उपस्थित होते. नगर शहरात सर्वांगीण बदलघडविण्यासाठी मुळे यांनी स्थापन केलेल्या जागरूक नागरिक मंचची भूमिका विशेष महत्वाची असल्याचे वसंत लोढा यांनी यावेळी सांगितले.