Breaking News

शेतीपूरक दुग्ध व्यवसाय धोक्यात खासगी दूध संस्थांचा मनमानी कारभार

उन्हाची तीव्रता वाढत चालली असून ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या चार्‍याचे दरही वाढत असताना गायी व म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये कोणतीही वाढ होत नसल्याने दुग्धउत्पादक तसेच शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी घेतल्यानंतर दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळेल असे वाटत होते. मात्र असे असताना खासगी दूध संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्‍यांना दुधासाठी वाढीव दर तर मिळालाच नाही. त्याएैवजी पुर्वी मिळत असलेला दरही मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये दूध धंदा करणे अडचणीचे ठरत असून आई भाकर देईना अन् बाप भिक मागू देईना अशी केविलवाणी अवस्था शेतकर्‍यांची झाली असून दूध दरवाढ मृगजळ ठरत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हिरव्या चार्‍याची उपलब्धता कमी झाली असून मागणी मात्र प्रचंड वाढली असल्याने हिरवा चारा तसेच इतर पशुखाद्याचे दर वाढले आहेत.