Breaking News

रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचा संपूर्ण जिल्ह्यात बोजवारा! दहाची नाणी स्विकारायला होतेय टाळाटाळ


भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाल्याचा कुठलाही निर्देश पारित केलेला नसतांना देखील ही नाणी घेण्यास सर्रास टाळाटाळ केली जात आहे. ही नाणी बंद झाली नसून ती स्विकारा, नकार देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार करा, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र या आदेशाचा संपूर्ण जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. पेट्रोलपंप, किराणा दुकान, मेडिकल एवढेच नव्हे तर काही राष्ट्रीयीकृत बँकादेखील वरिष्ठांचे आदेश नसल्याचे सांगत ही नाणी घेण्याचे टाळत आहेत. 

दहा रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा कोणीतरी सोडली आणि सर्वजण या अफवेला बळी पडत असल्याचे हल्ली पहायला मिळत आहे. ग्रामीण भागांत तर अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरतात. यामुळे बुद्धिमान लोकांसह सामान्य जनतेची मोठी अडचण होते. गेल्या अनेक दिवसांपासून दहा रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. सांभाळायची ‘कटकट’ नको म्हणून दहा रुपयांच्या नाण्यांऐवजी अनेकजणांना नोटा हव्या आहेत. परिणामी हल्ली अनेकाकांकडे अशी नाणी पडून आहेत. काही राष्ट्रीयीकृत बँक ही नाणी जमा करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला सर्रासपणे अपमानित करून हुसकावून लावतात. त्यामुळे ही नाणी बंद पडल्याचा चुकीचा संदेश सर्वत्र पसरला जात आहे. वास्तविक पहाता भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाल्याची कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र तरीदेखील अनेकजण ही नाणी घेण्याचे टाळत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. हल्ली राष्ट्रीयीकृत बँकांना सलग दोन दिवस सुट्या आल्याने अनेकांचे मोठे हाल झाले. 

विशेष म्हणजे ‘मल्टीस्टेट’चा टेंभा मिरवित असलेल्या आणि भाजप खासदाराच्या बँकेने तर मनमानीपणे स्वतःचेच अलिखित परिपत्रक काढले आहे. दहा रुपयांची १०० नाणी जर सोनईच्या या बँकेत एखाद्या ग्राहकाने नेली तर त्या ग्राहकाकडून प्रतिहजार रुपयांसाठी चक्क ६० रुपये कमिशन आकारण्याचा प्रताप येथे केला जात आहे. लोकांना बँकिंग नियमांविषयी ‘अडाणी’ ठेवायचे आणि त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत कमिशनच्या रुपाने बक्कळ पैसा उकळायचे पाप या बँकेच्या जवळपास सर्वच शाखांमधून सुरु आहे.