Breaking News

भवानी मातेचा शनिवारी यात्रोत्सव

भाविनिमगाव - शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील भवानीमातचा ( जगदंबा) चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत साजरा होत आहे. विविध पारंपारीक कार्यक्रम ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरे करतात. माहुरगडच्या रेणुका मातेचे एक रुप ( ठाणे ) असलेल्या येथील भवानी माता देवस्थान गावचे ग्रामदैवत तर अनेक भाविकांचे कुलदैवत आहे. चैत्रपौर्णिमेला या यात्रोत्सवास भाविकांची मोठी गर्दी होत असते. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरवात शक्तीचे प्रतिक असणाऱ्या रामभक्त हनुमानजयंती साजरी करून होते. तद्नंतर गोदावरी नदीवरून आणलेल्या गंगाजलाची ( कावड) सवाद्य मिरवणूक काढून भवानी मातेस व गावातील इतर दैवतांना गंगाजलाने स्नान घातले जाते. देवीच्या भवानी या नावरूनच गावाला भाविनिमगाव हे नाव पडल्याची व छत्रपती शिवाजी महाराज यांनी भाविक गाव असे उदगार काढले त्यावरूनही गावाला भाविनिमगाव नाव रूढ झाल्याची अख्यायीका आहे.