Breaking News

सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे पारनेर दौऱ्यावर

पारनेर /प्रतिनिधी/- शेतकरी मेळाव्यात बेशिस्त वर्तन करणाऱ्या तालुकाप्रमुखांची हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेला असतानाही काही लोकांकडून होत असलेल्या चुकीच्या प्रचाराचा समाचार घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे पारनेर दौऱ्यावर येत आहे. अशी माहिती तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी दिली. 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की ,आमदार विजय औटी यांच्या एकसष्टी निमित्त आयोजित अभीष्टचिंतन व शेतकरी मेळाव्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी पदच्युत तालुकाप्रमुख नीलेश लंके हे कार्यकर्त्यांच्या खांदयावर बसून घोषणाबाजी करत सभास्थळी आले. तेव्हा पक्षप्रमुखांनी संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांना सूचना करून हा बेशिस्त प्रकार थांबविण्यास भाग पाडले. कार्यक्रमात लंके समर्थकांनी पुन्हा घोषणाबाजी करत गोंधळ निर्माण केला. त्यामध्येच पक्षप्रमुख ठाकरेंचे अंगरक्षक बसले असलेल्या आ. औटींच्या वाहनावर दगडफेक झाली. त्यात त्या वाहनाची काच फुटली. ही बाब पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या कानावर गेल्यावर त्यांनी लंके यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांची हकालपट्टी करत विकास भाऊसाहेब रोहकले यांची नियुक्ती केली. 

पारनेरात अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदेना पारनेर दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्याचे अधिकार आ. विजय औटी ना देण्यात आले आहे.