भाळवणी गणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस लंके भावी आमदार : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मुक्ताफळे
तालुक्याचा भावी आमदार निलेश लंके व्हावा, अशी मुक्ताफळे भाळवणी गणातील राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या यांच्या पतीने उधळल्याने राष्ट्रवादीचे तालुका सर्वेसर्वा सुजित झावरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्यात हा विषय चर्चेचा बनला असून या विधानावर राष्ट्रवादी समर्थकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. या प्रकाराने झावरे व धुरपते समर्थकांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
पारनेर तालुक्याचा शिवसेना तालुका प्रमुख मीच आहे, असा दावा करणारे निलेश लंके यांचा वाढदिवस शनिवारी (दि. 10) मोठ्या शक्तीप्रदर्शनात हंगा येथे साजरा करण्यात आला. या सभेत राष्ट्रवादीच्या भाळवणी गणातील बड्या कार्यकर्त्यांने लंके यांच्याविषयी बोलताना लंकेच, आगामी भावी आमदार! असा उल्लेख केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भाळवणी गणातून पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते निवडून आल्या आहेत. त्यांचे पती उद्योजक सुरेश धुरपते यांनी हे विधान केले होते. उद्योजक धुरपते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशेषत: सुजित झावरे यांचे कट्टर समर्थक होते. परंतू काही कारणास्तव झावरे व धुरपते यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यातच धुरपते यांनी लंकेच भावी आमदार व्हावेत, अशी वल्गना ध्वनीक्षेपणावर हजारो कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केल्याने राष्ट्रवादीतील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
या विधानानंतर काहींनी धुरपते यांची समजूत घातली असल्याचे समजते. परंतू राष्ट्रवादी समर्थकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
झावरे-लंके यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध : धुरपते
पारनेर तालुक्यात अनेकांमध्ये राजकीय मतभेद आहेत. परंतू सर्वच राजकीय मंडळींचे एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीचे सुजित झावरे व शिवसेनेचे निलेश लंके हे एकाच वाहनातून झळकले होते. त्यामुळे राजकारण व मैत्रीपूर्ण संबंध वेगळ्या बाबी असून दोघांशीही आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मित्र मोठा व्हावा याच भावनेतून हे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.