Breaking News

श्रीगोंद्यात वाळू तस्करांचा शेतकर्‍यावर प्राणघातक हल्ला ; महसूल प्रशासनाचा आशीर्वाद

शहरानजीक भोळे वस्ती शेजारी असलेल्या आंबील ओढ्यातून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत आहे. तो वाळू उपसा त्वरित बंद करावा या मागणीसाठी भोळे वस्ती येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिल्यामुळे वाळू तस्करांनी दि. 13 रोजी रात्री 9 वा. सुमारास एका शेतकर्‍यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. याबाबत श्रीगोंदे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदे शहरापासून अगदी 5 किमी च्या अंतरावर भोळे वस्ती नगरपालिका हद्दीमध्ये आंबील ओढा आहे. या ओढ्याच्या शेजारी चंद्रकांत गिरजा गाडेकर यांच्या मालकीची शेतजमीन आहे. परंतू या शेतजमीनीस लागूनच महाराष्ट्र शासनाचे सुमारे 5 एकर गायरान क्षेत्र आहे. या आंबील ओढ्यामधून श्रीगोंदा शहरातील काही वाळू तस्कर 2-3 महिन्यांपासून या ठिकाणाहून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यातच चंद्रकांत गाडेकर यांची पाण्याची विहीर ओढ्याच्या शेजारी असल्याने व वाळू तस्कर खोलवर वाळूचे उत्खनन करत असल्याने गाडेकर यांच्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने त्यांची पिके जळून खाक झाली. त्यामुळे त्यांनी सुरु असलेला अवैध वाळू उपसा बंद करण्याबाबत काही ग्रामस्थांच्या सहाय्याने श्रीगोंदा तहसीलदार यांना सोमवार दि. 12 मार्च रोजी निवेदन दिले. 


याची माहिती वाळू तस्करांना समजताच मंगळवार दि. 13 रोजी चंद्रकांत गाडेकर रात्री 8. 30 वाजण्याच्या सुमारास विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता, तेथे असलेल्या अरिफ महंमद मालजप्ते यांच्या मालकीचा जेसीबी व नागराज कोथिंबीरे यांचा एक ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोंडीबा भोळे, तात्याराम भोळे, नागराज कोथिंबीरे व एक अनोळखी असे चार जण वाळू उपसा करत असल्याचे दिसले. त्यावर तुम्ही वाळू उपसा करू नका असे म्हणताच या चारही इसमांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू आमच्या विरोधात तहसीलदाराकडे तक्रारी करतोस काय असे म्हणत नागराज कोथिंबीरे याने जेसीबीच्या बकेटने जोरात छातीत मार दिला. त्यामुळे ते खाली पडले व कोंडीबा भोळे याने ट्रॅक्टर चालू करून अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतू गाडेकर तेथून जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना तात्याराम भोळे याने पकडून खाली पाडले व लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर चारही आरोपी तेथून यंत्रे घेऊन पळून गेले. यामध्ये चंद्रकांत गाडेकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे औषध उपचारासाठी आणले असता, त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला रात्री उशिरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करीत आहेत.

आंबील ओढा या ठिकाणी गेले दोन ते तीन महिन्यांपासून अवैध वाळू उपसा होत असल्याबाबत श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन देऊनही महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई अवैध वाळू तस्करांवर झाली नाही. उलट सोमवार दि. 12 रोजी निवेदन दिल्याने तहसीलदार यांनी कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पाठविले, परंतू सोमवार दिवस असल्याने सर्व ग्रामस्थ आठवडे बाजारासाठी शहरात आले होते. परंतू आंबील ओढ्याच्या गायरानात अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला होता. त्याचा पंचनामा करून जाताच काही वेळातच वाळू तस्करांनी वाळूचा साठा गायब केला. म्हणजे महसुल अधिकारी पंचनामा करायला गेले होते का ? अवैध वाळू तस्करांवर महसूल प्रशासनाचा आर्शिवाद असल्यामुळेच चंद्रकांत गाडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याचे चंद्रकांत यांचा मुलगा विजय गाडेकर यांनी सांगितले.