Breaking News

ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी थांबत नसल्याने रिपाईचा आंदोलनाचा इशारा

ग्रामीण रुग्णालय केवळ देखाव्यासाठी आहे का काय? येथे रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याने ग्रामीण रूग्णालय बंद करून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याची मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री दिपक सावंत यांचेकडे निवेदनद्वारे केली आहे.


जामखेडचे ग्रामीण रुग्णालय हे मात्र एक देखावा म्हणून आहे, येथे वेळेवर कोणीही उपस्थित असत नाही. जिल्ह्यातील जामखेड तालुका हा बीड, सोलापूर, उस्मानाबाद या तीन जिल्हयांचे प्रवेशद्वार असून जामखेड शहरातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील व शेजारी तालुक्यातील हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ याठिकाणी असते. जामखेडचे ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षांपुर्वी गोरगरीब गरजू रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन उपचार करून पेशंटला अ‍ॅडमीट करून घेतले जात, परंतू अलीकडील काही वर्षापासून जामखेड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व त्यांचे कर्मचारी रुग्णालयात हजर नसल्याचे निदर्शनास येत आहे. डॉक्टर साहेबांना बोलविण्यासाठी फोन करण्याची वेळ येते, त्यानंतर डॉक्टर रुग्णालयात अर्धा ते एक तासाने येतात. रूग्णांना अ‍ॅडमीट करून घेतले जात नाही. याठिकाणी एक्सरे काढले जात नाही. सोनोग्राफी केली जात नाही. लॅब असुन रक्त तपासणी केली जात नाही. या गोरगरीब, गरजू रुग्णांना बाहेरच्या खाजगी रूग्णालयात जाऊन जास्त पैसे घालून हे तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे गोरगरीब गरजू रुग्णांची कुचंबना होऊन हाल सहन करावे लागतात. डॉक्टरांकडून पेंशट खाजगी रुग्णालयात पाठविण्यासाठी चिठ्ठी देऊन पेशंटला महागडया दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. हालाकिची परिस्थिती असल्याने काही रूग्ण उपचार घेऊ शकत नाहीत.
पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रुग्णालय जामखेड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने गरीब रुग्णांना सेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयावर डॉक्टर, सिस्टर, सर्व कर्मचार्‍यांची नेमणूक असताना हे वेळेवर येथे उपलब्ध नसतात, तसेच मेडिसिनचा पुरवठा करूनदेखील हे लोक आपल्या कामात हलगर्जीपणा करून गरीब, शोषित, पिडीत रूग्णांचे शोषण करतात, त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टर व कर्मचार्‍यांकडून सेवा मिळत नसल्याने रुग्णालय बंद झाल्यात जमा आहे. रुग्णालयात पोस्ट मार्टम व पोलिस केसमधील जखमी रुग्णांशिवाय इतर पेशंटला उपचार मिळत नाही. डॉक्टर व कर्मचारी हेडक्वॉर्टरला राहत नसून, शासनाकडून मोठ्या प्रमाणात घरभाडे वसूल करतात. डॉ. युवराज खराडे, डॉ. लामतुरे हे आपले स्वतःचे भव्य हॉस्पिटल चालविण्यात व्यस्त असतात. तरी या कामात हलगर्जीपणा करणार्‍या संबंधीतांची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि ग्रामीण रुग्णालय बंद करून जामखेड शहरातील व तालुक्यातील आणि परिसरातील गरीब गरजू रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून पुर्णवेळ सेवा देणारे डॉक्टर व कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. रुग्णांची होणारी गैरसोय दूर करावी आमच्या निवेदनावर 15 दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास रिपाई पक्षाच्या वतीने जामखेड ग्रामीण रुग्णालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन केले जाईल. त्याचबरोबर आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.