धूर-धुळीमुळे, दमा-छातीच्या आजारांमध्ये वाढ : डॉ. इमरान
सध्या अहमदनगरच्या रस्त्यांची अवस्था पाहता धुळीचे प्रमाण तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये रॉकेल मिश्रित पेट्रोल वापर वाढल्यामुळे धुरांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ज्यामुळे नकळत लोकांना दमा, अॅलर्जी व छातीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. अशा रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासर्व रोगांच्या तपासण्या व उपचार खर्चिक असून, त्यासाठी इतर शिबीरांप्रमाणेच दमा, अॅलर्जी व छातीच्या रोगांची शिबीरे घेणे काळाची गरज होत चालली आहे, असे प्रतिपादन डॉ. इमरान शेख यांनी केले.
युनायटेड सिटी हॉस्पिटल व मखदुम सोसायटीच्यावतीने मुकुंदनगर येथील शफी क्लिनिक, बडी मस्ज़िद रोड, मुकुंदनगर, अहमदनगर येथे दमा, अॅलर्जी व छातीच्या विविध रोगांवर मोफत तपासणी व उपचार शिबीराप्रसंगी इमरान शेख बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक फैय्याज शेख, पुणे येथील अस्थमा अॅालर्जिक सुप्रसिद्ध डॉ. लक्ष्मीकांत कवटेकवार, डॉ. शबनम शेख, डॉ. सुलभा पवार-जंजीरे, डॉ. प्रियन जुनागडे, डॉ. अमित नघाटे, डॉ. अमित पवार, डॉ. विनायक शिंदे, डॉ. अमित पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. शबनम शेख यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अमित पवार यांनी केले. आभार आबीद दुलेखान यांनी मानले.