Breaking News

स्वस्त सोन्याच्या अमिषातून एकाचा खून; एक जखमी


जामखेड तालुक्यातील जवळा शिवरात स्वस्तात सोने घेण्याच्या व्यवहारातून एकाचा खून करण्याची घटन नान्नज-जवळा रस्त्यावर जवळा शिवारात घडली असून, मृत व्यक्तीच्या भावालाही जबर मारहाण करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 मार्च रोजी मयत हा त्याच्या भावाकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी येथे आला, भावाला म्हणाला की, जामखेड तालुक्यातील जवळा येथील पारधी समाजातील काही लोक हे माझेकडे वर्धा येथे कापूस वेचण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांची ओळख झाली, ते मला म्हणाले की, आम्हाला सोने सापडले आहे, तुम्हाला स्वस्तात सोने देतो, आणि या अमिषाला दोघे भाऊ बळी पडले.
 
यानंतर काल दि. 27 रोजी मयत डॉ. श्रीकृष्ण जोगेश हालदार (वय 34) रा. वर्धा व मनोरंजन जोगेश हालदार (वय 38) रा. नवेलीया पो. पुर्व विष्णूपूर ता. चारधाव, जि. नदीयार (प. बंगाल) हल्ली राहणार भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद हे दोघे जामखेड तालुक्यातील जवळा शिवारात आले. तेथे असलेल्या अनोळखी तीन पुरूष व एका महिलेने सोन्याच्या बदल्यात तीन लाख रूपये हालदार बंधुकडून घेतले. मात्र खोटे सोने हातात पडल्यानंतर आपण फसलो गेल्याचे हालदार बंधुच्या लक्षात आल्यानंतर हालदार व या अनोळखी चौघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत श्रीकृष्ण हालदार (वय 34) यांचा अनोळखी चोघांनी जागीच खून केला. तर मनोरंजन हालदार यांना जबर मारहान झाली मात्र ते तेथून पळुन गेल्याने वाचले. दरम्यान पोलीस उपनिरिक्षक नामदेव सहारे, पोलीस गणेश साने, गणेश गाडे, अमिन शेख, बेल्हेकर यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्वतःच्या रूग्नवाहिकेतून मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे आणला. या घटनेची माहिती मिळताच जवळाचे कामगार तलाठी मोहन कुमटकर व पोलीस पाटील कांतीलाल वाळुंजकर पाटील व तान्हाजी पवार यांनी पोलीसांना मदत केली आहे.