Breaking News

सोनई येथे क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराला प्रारंभ


क्रीडा क्षेत्रात वेळोवेळी होणार्‍या बदला बरोबर क्रीडा शिक्षकांनी अपडेट रहावे या करीता शासन स्तरावरून क्रीडा शिक्षकांना तंत्रशुद्ध पद्धतीने खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्षी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय अ.नगर व मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षणास सोनई (ता.नेवासा) येथे प्रारंभ झाला.
 
शिबीराचा प्रारंभ मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या हस्ते तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडाधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव विनायक देशमुख, राज्य महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, सुनील गागरे, बळीराम सातपुते, सोपान लांडे, रमेश दळे, अजीत कदम यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

प्रशिक्षणाची सुरुवात सकाळी 6 वाजता पुरक हालचालींनी सुरुवात होऊन योगा-एरोबिक्स नंतर सकाळी व सायंकाळच्या सत्रात प्रात्यक्षिक मैदानावर घेतले जाते. या प्रात्यक्षिकात अ‍ॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हॉकी, कराटे, तायक्वांदो, फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल आदि खेळांचे तंत्रशुद्ध प्रात्यक्षिक सादर केले जात आहे. तसेच या खेळा व्यतिरीक्त शालेय स्पर्धेत समाविष्ट इतर खेळांची माहिती व प्रात्यक्षिक सायंकाळच्या 6 ते 7 या सत्रात होऊन दिवसाची सांगता होते.

दुपारच्या सत्रात विविध खेळातील तज्ञ, फिजिओथेरपीस्ट, स्पोर्टस् सायकॉलॉजीस्ट, आहार तज्ञ, तसेच शासकीय योजना या संबंधीची तंत्रशुद्ध माहिती चर्चासत्रातून शिबीरार्थींना दिली जाते. सदरील प्रशिक्षण हे दहा दिवसीय निवासी शिबीर आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नेवासा तालुकाध्यक्ष पाटील तुवर, जतीन सोलंकी, घनशाम सानप, संभाजी निकाळजे, संतोष खैरनार प्रयत्न करत आहेत. या प्रशिक्षणास 85 प्रशिणार्थी सहभागी असून, राज्य स्तर प्रशिक्षण घेतलेल्या 10 मास्टर ट्रेनर्स मार्फत प्रशिक्षण दिले जात आहे.