Breaking News

धर्मा पाटील यांच्या पत्नीचे धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन

शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी जमिनीच मोबदला योग्य मिळावा यासाठी मुंबई मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर प्रशासनातर्फे जो मोबदला देण्यात आला तो अत्यल्प असून याचा निषेध नोंदवित न्याय हक्कासाठी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी आज, 9 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. विशेष म्हणजे यावेळी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र हा अस्थिकलश घेवून आला होता.

यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, शासनाकडून माझ्या पतीवर व आम्हा कुटूंबियांवर झालेला अन्याय अद्यापपर्यत दूर होत नाही. त्यासाठी मी, आंदोलन उभारत असून जोपर्यत न्याय मिळत नाही तोपर्यत पतीच्या अस्थीचे विसर्जन केले जाणार नाही. तसेच शासनाने अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा व आंब्याच्या झाडांचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून धर्मा पाटील यांनी हे पाऊल उचलले होते. त्यानंतरही आम्हाला पुरेशी नुकसान भरपाई शासनाकडून मिळाली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. 
तर धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र याने सांगितले की, आम्हाला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. शासनाने 48 लाखांची भरपाई मंजूर केली. मात्र ती तुटपुंजी आहे. मंजूर केलेले 48 लाख रुपये कोणत्या निकषापोटी मंजूर केले, याबाबत सचिव पातळीवर अधिका-यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तर आमच्या शेताशेजारी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे शेत आहे. त्या शेताला जास्तीची मोबदला आणि आम्हाला कमी असे कोणत्या नियमाने हा संशोधनाचा विषय ठरला आहे. जो पर्यत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यत आता माघार नाही.