Breaking News

‘अमन’ची सामाजिक बांधिलकी ; महिलेला मिळाला रोजगार

राहुरी ता. प्रतिनिधी - पतीचे छत्र हरपलेले, जन्मजात कुटूंबातील तीन मुलांवर अंधत्वाचे संकट. अशा परिस्थितीत या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मिनाज शेख या असहाय्य मातेवर आली. मात्र सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील अमन सोशल असोसिएशनच्यावतीने या मातेला शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगार. ही भेट या मातेच्या जीवनात काळोखातला दिवा बनली आहे.

राहुरी कारखाना येथील मिनाज शेख या महिलेचे कोल्हार येथील राजू शेख यांच्याशी विवाह झाला. कालांतराने व्यवसायानिमित्त ते राहुरी कारखाना येथील येथे स्थायिक झाले. त्यांना पहिला मुलगा शोएब जन्मतः अंध झाला. त्यानंतर दुसरी मुलगी नाजियालादेखील जन्मतःच अंधत्व आले. तिसरे अपत्य मुलगा साजीदही अंध जन्मला. परिणामी शेख कुटूंब हतबल झाले. हे सारे कमी म्हणून की काय, या मुलांचे वडील राजू शेख सँट्रिंगचे काम करीत असंतांना कामानिमित्त पुणे येथे गेले. काही दिवसांनी सुट्टी घेऊन ते राहुरी कारखाना येथे आले आणि तलावात पाय घसरल्याने पाण्यात बुडून मरण पावले. एकीकडे मुलांची दयनीय स्थिती आणि पतीचे अकाली निधन यामुळे मिनाज शेख यांच्यावर दुःख आणि संकटांचा जणू डोंगरच कोसळला. 

दरम्यान, या कुटुंबाविषयी राहुरी येथील अमन सोशल असोसिएशनचे अध्यक्ष भैय्या शेख यांना समजले. त्यांनी जाऊन विचारपूस केली. मिनाज शेख यांना रोजगाराची मदत करण्याच्या उद्देशाने अमन सोशलच्यावतीने अनमोल कंपनीची उच्च दर्जाची शिलाई मशीन भेट देण्यात आली. यामुळे घरखर्च चालविणे त्यांना शक्य होणार आहे. यावेळी अध्यक्ष भैय्या शेख, उपाध्यक्ष अफजल पठाण, सेक्रेटरी बादशहा शेख, अब्दुल रज्जाक शेख, समीर शेख, अब्दुल आतार अकिल शेख, अजमखान पठाण, जिलानी बेग, जेनुद्दीन शेख आदी उपस्थित होते.