Breaking News

पाणी पातळीत वाढ होण्यासाठी दक्षता आवश्यक : औताडे


जलस्त्रोतांचे साठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. त्यामुळे जलस्रोतांचे संवर्धन आणि पाणी पातळीत वाढ होण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी केले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालायच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक जलदिनानिमित्त ते बोलत होते. या महाविद्यालयात जागतिक जलदिन सन १९९३ पासून, २२ मार्च ला वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. यानिमित्त घोषवाक्यांद्वारे पाण्याचे आपल्या जीवनात काय महत्व, हे समजावून सांगितले जाते. यावेळी महाविद्यालयापासून ते दत्तक गाव चंद्रापूर येथे भव्य शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ‘पाणी वाचवा’, ‘देश वाचवा’, ‘जल है तो कल है’ यांसारख्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांना पाण्याचे महत्त्व सांगून जनजागृती केली.

त्यानंतर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक व कृषीभूषण बन्सी तांबे यांच्या शेतीस भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाणी व्यवस्थापनाचे महत्त्वही समजून घेतले. पाण्याचा जर काटकसरीने वापर केला नाही तर भविष्यात फक्त आपल्या डोळ्यातच पाणी राहील. त्याचबरोबर प्रगतशील शेती करायचे असेल तर पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे मत बन्सी तांबे यांनी व्यक्त केले. रासेयोचे समन्वयक प्रा. प्रविण गायकर म्हणाले, की भारतातील कृषीचे उत्पादन व उत्पन्न हे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. त्यासाठी पाणी वाचवण्याची आणि जलस्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पाण्याचा योग्य वापर आणि पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

यावेळी प्रतिक्षा अभंग, मोनिका आंधळे, श्रद्धा बोरसे, मृणाली जगताप यांनी जलदिनानिमित्त पोस्टरमार्फत जल संवर्धनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी रासेयो स्वयंसेवक विक्रमसिंह पासले याने बन्सी तांबे आभार मानले.