Breaking News

बोगस आठवडी बाजारावर होणार कारवाई आठवडे बाजारांची तपासणी करण्याचा महापालिकेचा निर्णय


पुणे : शेतकर्‍यांना आपला शेतमाल थेट शहरातील नागरिकांना विकता यावा या उद्देशाने कृषी विभागाच्या पणन महामंडळ आणि महापालिकेच्या वतीने शहरात संत शिरोमणी श्री सावतामाळी आठवडे बाजार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या आठवडे बाजारांच्या नावाखाली शहरभर स्थानिक भाजी विक्रेत्यांना शेतकरी म्हणून दाखवून पालिकेच्याच जागेत बोगस आठवडी बाजार भरविले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याची गंभीर दखल या आठवडे बाजारांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी पणन विभाग आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे संयुक्त तपासणी पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकाच्या माध्यमातून या बाजारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी पुढील आठवड्यापासून सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. अतिक्रमण विभागाच्या ताफ्यात 162 सहायक अतिक्रमण निरिक्षक दाखल होत असून त्यांचा या पथकात समावेश करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना आपला माल थेट ग्राहकांना विक्री करता यावा या उद्देशाने हे आठवडे बाजार सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिका आणि पणन महामंडळाकडून शेतकरी समूह गटांना मान्यता देऊन पालिकेची जागा दिली जाते.मात्र, गेल्या काही महिन्यांत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून काही जणांनी शहरात महापालिकांच्या जागांमध्येच आठवडे बाजार सुरू केले आहेत. या ठिकाणी विक्रीसाठी शेतकरी न बसता या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते तसेच स्थानिक भाजी विक्रेतेच मार्केटयार्डातून भाजी आणून विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात सुरू असलेल्या सर्व आठवडे बाजारांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका आणि पणन मंडळाचे संयुक्त तपासणी पथ स्थापन करण्यात आले असून हे पथक शहरात भरणार्‍या प्रत्येक आठवडे बाजारात परवाना प्रमाणपत्र तापसण्यासाठी जाणार आहे. तसेच, ज्या ठिकाणी बोगस शेतकरी आढळून येतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.