Breaking News

वक्तृत्व, कर्तत्व व नेतृत्व या क्षेत्रात पंतगराव कदम यांनी ठसा उमटविला’

मुंबई : माजी मंत्री विधानसभा सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या आठवणींना उजाळा देतानाच काही सदस्य भावूक झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष तसेच सदस्यांनी दिवंगत नेत्यांप्रती असलेल्या सहवेदना व्यक्त केल्या. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, डॉ. कदम हे अभ्यासू, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संसदपटू, कार्यक्षम लोकप्रतिनिधी असे व्यक्तिमत्व होते. वकृत्व, नेतृत्व, कर्तृत्व या तीनही बाबीत त्यांनी आपला ठसा उमटवला. राज्यभरातील अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकारी संस्था, सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. या सर्व क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले.


डॉ. कदम यांनी शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी 180 हून अधिक शैक्षणिक शाखा सुरु केल्या. शून्यातून सुरुवात करुन भारती विद्यापीठाची स्थापना केली व ते नावारुपाला आणले. सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्याचे मोठे कार्य करण्यासह अनेक गरीब विद्यार्थ्यांना आपल्या संस्थांमध्ये मोफत शिक्षण दिले. आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. ते जनमानसातील लोकप्रिय नेते होते. शोकभावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या व्यक्त ी शुन्यातून स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे होतात. अशा व्यक्ती जेव्हा समाजातून निघून जातात तेव्हा मोठी पोकळी निर्माण होते. विधानसभा सदस्य व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने वैयक्तिकदृष्ट्या मोठी हानी झाली असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. कदम हे अभ्यासू, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संसदपटू, कार्यक्षम लोकप्रतिनिधी, उत्तम संघटक तसेच वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व या तिन्ही गुणांचा संगम असणारे जनमाणसातील लोकप्रिय नेते होते. गेल्या चार वर्षात माजी मंत्री सांगली जिल्ह्यातील आर.आर.पाटील आणि डॉ. पतंगराव कदम हे उमदे नेतृत्व हरपले आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून शुन्यातून आयुष्य घडवले असे स्व. गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम, वसंत डावखरे असे महाराष्ट्राचे सामान्यातील नेतृत्व हरपणे म्हणजेच राज्यात पोकळी निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली.
डॉ. कदम यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विविध विषयांच्या 180 पेक्षा अधिक शैक्षणिक शाखा सुरू करून, लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे फार मोठे क ार्य त्यांनी केले. प्रगत शैक्षणिक संकल्पना जाणून त्याचा आपल्या शैक्षणिक संस्थामध्ये कृतीशील अवलंब करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. ते ख-या अर्थाने प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ होते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याबरोबर पत्रकार, समाजसेवक, कलाकारांना मानधन देण्याची योजना त्यांनी सुरू केली. विविध संस्थांचे सदस्य, अध्यक्ष, विश्‍वस्त, व्यवस्थापक, संचालक ही विविध पदे उत्तम कार्यासहीत त्यांनी भुषविली आहेत. विविध सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या.