Breaking News

भिरा’मुळे मार्चमध्येच होतेय अंगाची काहिली! नगरचे तापमान राज्यात दुसऱ्या क्रमांकावर : प्रा. शिंदे


अहमदनगर प्रतिनिधी - ‘भिरा’चे तापमान मार्चमध्येच का वाढते, याची कारणमिमांसा येथील भूगोलाचे निवृत्त प्राध्यापक आणि हवामानतज्ञ प्रा. बी. एन. शिंदे यांनी दिली आहे. भिराचा दक्षिणाभिमुखी उतार मार्चमध्येच सुर्याभिमुख येऊन विक्रमी तापमान वाढते. त्यामुळे दरवर्षी मार्चमध्ये अंगाची काहिली होते आणि उन्हाळा आल्याची सर्वांनाच जबरदस्त चाहूल लागते. मागील वर्षी दि. २९ मार्च २०१७ ला भिराचे तापमान ४६. ५ अंश सेल्सियस आणि यावर्षीदेखील आज {दि. २९} ४५ अंश सेल्सियस झाले. अहमदनगरमध्ये तीन दिवसांपूर्वी {दि. २७ } ४१ अंश सेल्सियस तापमान होऊन तापमानात नगर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलतांना दिली.

प्रा. शिंदे म्हणाले, की जगात यापेक्षा कितीतरी ठिकाणी तापमान जास्त असेलही. पण तेथे तापमान मोजण्याची यंत्रणा नसल्याने त्याचा बोध होत नाही. जसे पंधरा वर्षांपूर्वी जगात सर्वाधिक पाऊस चेरापुंजीत होतो, असा भास होत नाही. पण नॉसिवरमला पर्जन्यमापक बसविल्यापासून ते सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण बनले आहे. तसे पाहता भिरा मध्यकोकणात समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० फूट उंच व समुद्र सपाटीपासून ३२ किलोमीटर हवाई अंतरावर आहे. तसेच पर्वत पायथ्याच्या जंगली दरीत असून तेथे मे अखेर सूर्य डोक्यावर येतो. तर २१ जूनला सर्वात मोठा दिवस असल्याने मार्चमध्येच विक्रमी तापमानाची अपेक्षा नाही. पण भिराजवळून उत्तर दक्षिण वाहत असलेल्या कुंडलिका नदी खोऱ्यातील जंगल उभे कातळ उघडे पडले आहे. मार्चमध्ये येथे जरी दक्षिणेकडून थोडी तिरपी सूर्यकिरणे येत असली तरी येथील दक्षिणाभिमुख उतारावर ती लंबरूप होऊन तापमान वाढवितात. तसेच येथील उभ्या आंतर्वक्री कातळावरून परावर्तित होऊन भिरावर एकवटत असल्याने मार्चमध्येच तेथील तापमान विक्रमी वाढते. पूर्वी इटलीच्या किल्ल्यावरून आंतर्गोल आरशाच्या साहाय्याने खालच्या शत्रूवर सूर्यप्रकाश एकवटवून त्यांना भाजून पळवून लावल्याच्या नोंदी आहेत. पुढे मे जूनमध्ये जरी लंबरूप किरणे व दिवस मोठा होत असला तरी या दक्षिणाभिमुखी उतारावर ती तिरपी होतात. व तेव्हा ढग येऊन तापमान कमी होते. 

यावर्षी २७ मार्चला भिरापाठोपाठ नगरचे तापमान ४१. सेंट्रिग्रेड होऊन राज्यात ते दोन नंबरवर आले. कारण नगरसुद्धा भिराप्रमाणे तीन बाजूने हिवरेबाजार, मांजरसुंबा आणि चांदबिबी महालाच्या पण थोड्या दूर अंतरावर असलेल्या डोंगर रांगांत वसलेले आहे. दक्षिणेस सीना नदी जात असल्याने दक्षिणाभिमुख बशीच्या आकाराची रचना झाली आहे. शिवाय मार्च अखेर येथील ९० टक्के पिके निघून काळी जमीन उघडी पडल्याने मार्चमधील थोडा दक्षिणेकडून येणाऱ्या तिरप्या किरणांनी ते लंबरूप होऊन परिसर चांगलाच तापला होता. जोडीला दोन्ही ठिकाणी हवेत थोडे बाष्प असल्याने तापमान धरुन ठेवल्यास मदत झाली व हे विक्रम घडले. 

गेल्यावर्षी भिराचे तापमान ४६ . ५ अंश सेल्सियस झाले तेव्हा अनेक वृत्तवाहिन्या वैज्ञानिकांसह तेथे गेल्या. पण त्यांना हे मुख्य कारण सापडले नाही. मात्र शिंदे यांनी गेल्या २२ वर्षांपासून स्वखर्चाने हवामानाचे बहुदा अचूक अंदाज दिले. गेल्या तीन वर्षांपासून शाश्वत शेतीतून पर्यावरण संवर्धन व पर्जन्य नियमन कसे करावे, याविषयी सेमिनार घेऊन सर्वांना पटवून द्यायचा प्रयत्न करीत आहेत.