Breaking News

खेडच्या नवनाथ गाढवे यांना आदर्श लिपिक पुरस्कार जाहीर

कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयातील लिपिक नवनाथ गाढवे यांना राज्यस्तरीय आदर्श लिपिक पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर 2018 रोजी शिक्षकदिनी पुणे येथे भव्य समारंभात गाढवे यांना सन्मानित केले जाणार आहे.

मा. आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेत 1994 पासून नवनाथ गाढवे हे कार्यरत आहेत. विविध प्रशिक्षणे, शिबिरे, चर्चासत्र आदी उपक्रमात सहभागी होत त्यांनी आपल्या क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत ठेवून कामाचा ठसा उमटविलेला आहे. तालुक्यातील सर्व सहकार्‍यांना ते वेळोवेळी मदत करीत असल्याने त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत कुळधरण ग्रामविकास संघटनेने गेल्या वर्षी शिक्षकदिनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना आदर्श लिपिक पुरस्काराने सन्मानित केले होते. विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत मोरे हे वेळोवेळी सहकार्य करीत आवश्यक अद्ययावत साहित्य पुरवितात, मार्गदर्शन करतात त्यामुळेच चांगले काम करता येते, अशी भावना नवनाथ गाढवे यांनी व्यक्त केली. आदर्श पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.