Breaking News

कुकडी आवर्तनासाठी केलेल्या रास्ता रोको आंदोलनात पालकमंत्र्यांचा निषेध

कर्जत तालुक्यातील राशिन उपचारीला कुकडी आवर्तनाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राशिन-बारामती मार्गावर शेतकर्‍यांसह विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना टार्गेट करत पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सकाळी 10.30 ते 1.30 वा. पर्यंत चाललेल्या आंदोलनात तोडगा निघत नसल्याने शेतकर्‍यांनी आमच्यासह कुकडीच्या अधिकार्‍यांनाही अटक करा अशी मागणी पोलिसांकडे केली. अखेर पोलिसांनी दु. 1.30 वा. सुमारे 70 आंदोलकांना ताब्यात घेतले. 14 आंदोलकांना व्हॅनमधून कर्जतला आणत अटक करुन त्यांची सुटका करण्यात आली.

माजी पं. स. सदस्य शंकर देशमुख, माजी उपसरपंच शाहू राजेभोसले, विक्रम राजेभोसले, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव काळे, मालोजी भिताडे, डॉ. विलास राऊत, ज्ञानेश्‍वर सायकर, कुंडलिक सायकर, प्रा. अशोक पावणे, पवन जांभळकर, अ‍ॅड. हरिश्‍चंद्र राऊत, शिंपोर्‍याचे सरपंच बिभिषण गायकवाड, विष्णू सुळ, कमलदेव सपाटे, नामदेव गायकवाड यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक वसंत भोये, कुकडी कोळवडी येथील उपअभियंता व्ही. के. पाटील, मंडालाधिकारी आर. एफ. अरगडे, तलाठी लक्ष्मण जाधव यांनी आंदोलन स्थगित करण्याची वेळोवेळी मागणी केली. मात्र आंदोलक दाद देत नव्हते. उन्हाचा पारा चढल्याने डांबरी रस्ता चटके देवु लागला. आंदोलकांना रस्त्यावर बसणे कठीण झाले. अखेर बाजरीच्या पेंढ्या घेवुन आंदोलक तब्बल तीन तास ठान मांडून बसले. पाणीवाटप समितीचे अध्यक्ष व जलसंधारणमंत्री असताना स्वतःच्या मतदारसंघात पालकमंत्र्यांना शेतकर्‍यांना हक्काचे पाणी देता येत नाही. पालकमंत्री यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही संतप्त आंदोलकांनी भाषणातून केली. कुकडीचे अधिकारी कामात कुचराई करीत असल्याने त्यांचाही आंदोलकांनी शेलक्या शब्दात खरपूस समाचार घेतला.तुमच्या अधिकारात आम्हाला आश्‍वासन देता येत नसेल तर तुम्ही येथे थांबवू नका असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी उपअभियंता पाटील यांना तेथून बाहेर काढले.