Breaking News

यंदा हापूसला ‘अच्छे दिन’

रत्नागिरी/प्रतिनिधी : विदेशवारीसाठी फळांच्या राजाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण यावर्षी आंब्याची निर्यात वाढणार असल्याचा अंदाज पणन विभागाने व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसला विदेशातून चांगली मागणी आहे. हापूसच्या खास अशा चवीमुळे जगभरातील अनेक देशातून हापूस आंब्याची मागणी वाढत आहे. यावर्षी फळांचा राजा हापूसची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आंबा निर्यातीत यावर्षी 15 टक्के वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आजतागायत 12 हजार किलो आंबा इटलीमध्ये निर्यात करण्यात आला आहे. आंब्यासाठीची नवी मोठी बाजारपेठ म्हणून पणन मंडळाने दक्षिण आफ्रिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठीची चाचपणीही सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया येथील बाजारपेठा भारतीय आंब्यासाठी खुल्या झाल्या आहेत. मॉरिशसनेदेखिल यापूर्वीच भारतीय आंब्याला आपली बाजारपेठ खुली केली आहे. अमेरिका, चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, मलेशिया, मॉरिशस या देशातून यावेळी हापूसच्या आंब्याला चांगलीच मागणी आहे. यावर्षी आंब्याची निर्यात वाढल्याने कोकणच्या आंबा उत्पादकांतही आनंदाचे वातावरण आहे.