Breaking News

कर्ज मंजूर न केल्याने बँक कार्यालयासमोर उपोषण

तालुक्यातील नायगाव येथील भिमराव सोपान पाटील व बलभिम सोपान पाटील यांचे कर्ज प्रकरण मंजूर न केल्यामुळे अथवा टाळाटाळ करण्यात येत असल्याने कॅनरा बँक शाखा राजुरी ता. जामखेड बँक शाखेच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यातील नायगावचे रहिवासी असणारे भिमराव सोपान पाटील यांचे बंधू बलभिम पाटील यांनी कॅनरा बँक राजुरी या शाखेकडे आपल्या दैनंदिन गरजेसाठी कर्जाची मागणी केली, त्याचप्रमाणे कर्ज प्राप्तिसाठी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च करून जमीनीचे मॉरगेज केले, परंतू बँकेने कजर्र् देण्यास टाळाटाळ करून सांगितले, की तुमच्या वडीलांच्या नावे पुर्वीची कर्ज थकबाकी असल्याने आपणास थकबाकी भरल्याशिवाय कर्ज देता येणार नसल्याचे कारण व सबब सांगून कर्ज दिले नाही. त्यामुळे आमच्यावर हा अन्याय झाला असून न्याय मिळावा यासाठी आपण दि. 7 मार्च बँक कार्यालय शाखा राजुरी येथे आमरण उपोषण करत आहोत अशा आशयाचे निवेदन जामखेड तहसील, जामखेड पोलिस व कॅनरा बँक शाखा राजुरी त्याचबरोबर बँकेच्या वरीष्ठ कार्यालयास दिले. भिमराव व बलभिम पाटील नायगाव यांनी आपले उपोषण चालू केले आहे. याच पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने भिमराव व बलभिम यांना 149 ची नोटीस देऊन समजून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून न्याय मिळेपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. तर या विषयी बँक व्यवस्थापक अच्युत गोडगे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरील भिमराव व बलभिम या दोन्ही बंधूंचे उपोषण बेकायदेशीर असून त्यांच्या वडीलांच्या नावे सण 1988 साली घेतलेल्या शेती कर्जाची काही रक्कम थकीत असून ती भरल्या शिवाय बँक नियमानुसार कर्ज पुरवठा करता येत नसल्याने बँकेने कर्ज प्रकरण थांबवले आहे. त्यामुळे त्यांचे हे उपोषण चुकीच्या मार्गाचे असुन या संदर्भात बँकेच्या वतीने तहसील कार्यालय जामखेड यांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे. उपोषणकर्ते पाटील यांच्या वडीलांच्या नावे कर्ज असताना बँकेने कर्ज प्रकरण करण्यासाठी लागणारे शेतजमीनीचे मॉरगेज करण्यास का भाग पाडले, असा ही सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे, मात्र शेतकरी भिमराव व बलभिम यांनी कर्ज मिळेल किंवा न्याय प्राप्त होईल यासाठी आपले उपोषण चालूच ठेवले आहे.